प्रविण दरेकरांची लबाडी उघडकीस..  - Politics harassing dr tatyarao lahane praveen darekar | Politics Marathi News - Sarkarnama

प्रविण दरेकरांची लबाडी उघडकीस.. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

डाँ. लहाने यांचा जुना व्हिडिओ आमदार रोहितदादा पवार या फेसबूक ग्रुपवर शेअर करण्यात आला आहे.

 

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात मला त्रास झाला, असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी नुकतेच केले होते. त्याबाबत प्रवीण दरेकर यांनी डॉ. लहानेंच्या विरोधात उघडपणे भाष्य करत एवढ्या वरिष्ठ पदावरील व्यक्तींने राजकारण्यांसारखे असे जाहीरपणे भाष्य करणे योग्य नाही, अशी टीका केली होती. 

प्रवीण दरेकरांनी डॉ. लहानेंना पद्मश्री मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी पुढाकार घेतल्याचे म्हटले होते. पण याबाबतची वस्तूस्थिती काय आहे, हे दर्शविणारा डाँ. लहाने यांचा जुना व्हिडिओ आमदार रोहितदादा पवार या फेसबूक ग्रुपवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून दरेकरांची लबाडी उघडकीस आल्याचे म्हटले आहे.  

"वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रशासनातील बाबींवर जाहीर भाष्य करणे चुकीचे आहे. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी भाजपकडून नव्हे; तर एका व्यक्तीकडून त्रास झाल्याचे सांगितले आहे, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. त्यावर "ही व्यक्ती माजी मंत्री गिरीश महाजन आहेत का?' या पत्रकारांच्या प्रश्नावर मात्र "मला माहीत नाही. पण, त्या व्यक्तीचा मीही शोध घेत आहे' असे सावध उत्तर दरेकर यांनी दिले. 

हिंदुत्वाबाबत भाजपची भूमिका ठाम आहे; पण सत्तेसाठी शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्षाशी हातमिळवणी केली. राममंदिरापेक्षा त्यांना आता सत्ता महत्त्वाची वाटू लागली आहे. सत्तेसाठी त्यांचे हिंदुत्व पातळ झाल्याची टीकाही प्रवीण दरेकर यांनी लातूर येथे नुकतीच केली होती. राम मंदिरासाठी शिवसेना आक्रमक होती. आता राम मंदिराची उभारणी होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तिकडे गेलेही नाहीत. त्यांना राम मंदिरापेक्षा सत्ता महत्त्वाची वाटू लागली आहे. हिंदुत्व हे कृतीतून दाखवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. 

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी भाजपच्या काळात "वॉटर ग्रीड' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी देऊन पैशांची तरतूद केली. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून हा प्रकल्प मार्गी लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

राज्य सरकारने दारूवरील शुल्क माफ केले, बिल्डर्सचे शुल्क माफ केले; पण कोरोनाकाळातील वीजबिल माफ केले जात नाही. उलट जास्तीची बिले पाठवली गेली. सक्तीने वसुली केली जात आहे. गोरगरिबांची पिळवणूक करणारे हे सरकार आहे. या सरकारला संवेदनाच नाहीत. या पुढील काळात सक्तीने वसुली केली तर ग्राहकांना वीजबिल भरू दिले जाणार नाही. जनतेसाठी जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा दरेकरांनी दिला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख