भाजपचे राज्यातील दिग्गज नेते दिल्लीत; मोठ्या घडामोडींची चिन्हे!

प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या वावड्या...
Fadnavis-pankaja-Patil
Fadnavis-pankaja-Patil

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आज तीन दिवसांच्या दिल्ली भेटीसाठी राजधानीत आले. संसदेचे अधिवेशन चालू असताना पाटील यांना भाजपच्या सर्वोसर्वा नेतृत्वाने दिल्लीत बोलावून घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Chandrakant Patil in New Delhi for three days) देवेंद्र फडणवीस हे रविवारी दाखल होत आहेत. 

भाजप नेतृत्व, पक्षाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री व खासदार यांच्याशी बैठका व चर्चा हे पाटील यांच्या दिल्ली भेटीचे घोषित कार्यक्रम सांगितले जातात. मात्र राज्यात प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्तावित बदल, पक्षसंघटनेत व्यापक बदल करणे व राज ठाकरे यांच्या मनसेबरोबरची मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील प्रस्तावित घोषित-अघोषित युती हे त्यांच्या अजेंड्यावरील मुख्य विषय असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

मुंबईच्या निवडणुकीनंतर प्रस्तावित असलेल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलामध्ये आमदार आशिष शेलार यांचे नाव स्पर्धेत आघाडीवर आहे. दुसरीकडे पंकडा मुंडे, विनोद तावडे हे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे खरोखरीच प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात की काय, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित नेत्यांच्या समर्थकांना आपल्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्यासाठीच दिल्लीत बोलावून घेतले असावे, असे वाटत आहे. पक्षावर नाराज असल्याची नेहमीच चर्चा असलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. त्यादेखील त्याच निमित्ताने पक्षाध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. विनोद तावडेंकर हरयानाची जबाबदारी असल्याने ते देखील त्याच कामसााठी आले आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष बदलणार नसल्याचा ठाम शब्दांत दावा केला असला तरी भाजपचे प्रदेश पातळीवर अनेक नेते एकाच वेळी दिल्लीत गेल्याने चर्चा थांबलेली नाही. भाजपमधील नेत्यांच्या म्हणण्यानुसार  राष्ट्रीय अध्यक्षांनी सर्वच राज्यांतील नेत्यांना वेळ देऊन बोलविलेले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने अनेक केंद्रीय मंत्री, संबंधित राज्यांचे खासदार आणि प्रदेश पातळीवरील इतर नेते यांच्याशी संवाद साधण्याचे काम हे आधी ठरलेल्या नियोजनानुसार आहे. त्यात फेरबदलाची कोणतीही शक्यता नाही. 

चंद्रकांत पाटील यांनी आज पहिल्या दिवशी राज्य प्रभारी सी टी रवी , केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भागवत कराड व कपिल पाटील या मंत्र्यांबरोबर गाठीभेटी केल्या. ते रविवारी पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नारायण राणे यांच्याशी चर्चा करतील. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सोमवारी दुपारी भाजप मंत्री व खासदारांशी ते जेवणाच्या निमित्ताने चर्चा करतील व रात्री महाराष्ट्र सदनात पुन्हा त्यांच्याशी चर्चा करतील.

या दरम्यान पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही पाटील यांना वेळ देण्याची शक्यता आहे. सोमवारच्या बैठकीवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्य प्रभारी सी. टी. रवी हेही हेही उपस्थित राहतील अशी माहिती आहे. आपण पंतप्रधानांच्या भेटीसाठीही विनंती केली असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र या दरम्यान केंद्रीय मंत्रिपरिषदेची तीन दिवसीय बैठक व यूपीची धामधूम सुरू असल्याने मोदी त्यांना तत्काळ वेळ देतील का, हाही प्रश्न आहे.

राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर मुंबई महापालिकेत युती करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील व भाजपचे राज्यातील नेतृत्व म्हणजे पडणवीस विशेष आग्रही आहेत. या प्रक्रियेत कॉंग्रेसच्या एका चर्चित दाक्षिणात्य नेत्याचे जवळचे नातेवाईकही सामील असल्याचे समजते.  मुंबई निवडणुकीच्याच दरम्यान उत्तर प्रदेशातही विधानसभेची रणधुमाळी आहे. राज ठाकरे यांच्याशी भाजपने युती करणे याचे थेट व प्रतीकूल पडसाद उत्तर प्रदेशात उमटू शकतात. यूपी बाबत भाजप नेतृत्व धोका स्वीकराण्यास अजिबात तयार नसल्याने मनसेबरोबर घोषित युती करावी व उत्तर प्रदेशातील सत्ता वापसीनंतर त्याला अधिकृत रूप द्यावे, असा मतप्रवाह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात आहे. हा प्रस्ताव रोखठोक ठाकरे स्वीकारतील का हाही प्रश्न आहे.

दरम्यान पक्षाच्या खासदारांशी होणाऱया जाहीर चर्चेत सर्वश्री पाटील व फडणवीस राज्यातील लसीकरणाला गती देणे, लसींचा अपेक्षित वापर न केल्याबद्दल राज्य सरकारला धारेवर धरणे, राज्य सरकारमधील तीनपक्षांतील विसंवाद व अंतर्गत मदभेद जनतेसमोर उघड करणे, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच बूथ पातळीपासून पक्षसंघटन मजबूत करणे, आपापल्या मतदारसंघांतील कामे दिल्लीतून वेगाने करवून घेणे आदी मुद्यांवर मार्गदर्शन करतील असे समजते. राज्य सरकारबाबतचा ‘करेक्ट कार्यक्रम़' करू असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्याबाबत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना थेट भाष्य न  करता ‘‘तुमच्या शुभेच्छा असू द्या,‘ असे सांगून विषय संपविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com