'मातोश्री'तील साहेब 'मातृतीर्थ'कडे लक्ष देतील का..  - political Maharashtra news matrutirtha sindkhed raja development plan buldana cm  | Politics Marathi News - Sarkarnama

'मातोश्री'तील साहेब 'मातृतीर्थ'कडे लक्ष देतील का.. 

गजानन काळुसे 
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

मातृतीर्थचे  जतन व संवर्धन करण्यासाठी सरकारने विकास आराखड्याचे नियोजन केले होते.

सिंदखेड राजा : राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेले मातृतीर्थ, सिंदखेड राजा शहराचा विकास होण्यासाठी सरकारकडून सिंदखेड राजा विकास आराखडाचे नियोजन करण्यात आले होते.

त्यानुसार 2015 मध्ये तत्कालीन सरकारने सिंदखेड राजा विकास आराखड्याला मंजुरी दिली होती. त्यानुसार स्थानिक नगर परिषदेच्या माध्यमातून 17 मे 2016 रोजी जिल्हा नियोजन समितीकडे विविध विकास कामांसाठी 76.32 कोटी चा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

सिंदखेड राजा शहरासाठी पाणी पुरवठा वितरण व्यवस्था, भुयारी गटार योजना, मोती तलावांचे सुशोभीकरण, चांदणी तलावांचे सुशोभीकरण, जिजाऊ विकास आराखडा अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामे या प्रमुख कामाचा समावेश होता. परंतू अनेक वर्षे उलटून स्थानिक नगर पालिकेच्या माध्यमातून कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सिंदखेड राजा विकास आराखड्याचे काम हे फक्त लाल फिती मध्ये अडकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नगर पालिका व प्रशासन करते तरी काय ? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. 

मातृतीर्थ सिंदखेड राजा शहराचा विकास होण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी विकास कामे व ऐतिहासिक गोष्टींचे जतन व संवर्धन करण्यासाठी सरकारने विकास आराखड्याचे नियोजन केले होते. स्थानिक नगरपालिकेच्या माध्यमातून सिंदखेड राजा  शहरातील नागरीकांना पाणीपुरवठा व्यवस्थित मिळण्यासाठी अंदाजे किंमत 14.42 कोटी चा प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्याची तांत्रिक मान्यता होऊन सुद्धा सरकारकडे सादर करण्यात आला परंतु शासनाच्या नगर विकास विभागाकडून अद्यापही प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही. भुयारी गटार योजना अंदाजे किंमत 36.64 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य अभियंता यांच्याकडे तांत्रिक मान्यता साठी सादर करण्यात आलेला आहे. 

प्रस्तावात त्रुटी असल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित आहे. मोती तलाव जलसंवर्धन व  सुशोभिकरण करण्यासाठी अंदाजे किंमत 10.64 कोटी प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे सादर करण्यात आला होता, परंतु या प्रस्तावामध्ये काही त्रुटी असल्यामुळे सदरचा प्रस्ताव हा परत आला होता त्यानंतर नगरपालिकेने संबंधित एजन्सीला पत्र देऊन त्रुटी पूर्ण करण्याचे सांगितले असल्याची माहिती आहे. मोती तलावाचे मालकी हक्क हे सहाय्यक संचालक पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे पाठपुरावा करत असल्याची माहिती आहे.

चांदणी तलाव जलसंवर्धन व सुशोभिकरण करण्यासाठी अंदाजे किंमत 10.21 कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. परंतु चांदणी तलावाचे मालकी हक्क भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग नागपुर यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात आलेली आहे, परंतु ते सुद्धा मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक नगरपालिकेत प्रशासन करते तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

जिजाऊ विकास आराखडा अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते त्यापैकी 2 कोटी रुपये नगर पालिकेला सन 2019 मध्ये प्राप्त झाले होते. 1 कोटी रुपयांच्या माध्यमातून नगर पालिकेने उद्यान विकसित करण्याचे ठरवले आहे त्यासाठी 1 कोटी रुपये खर्च होणार आहे. तर 1 कोटी रुपयांमध्ये पाणी पुरवठा साठी जलकुंभांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी दिली आहे. 

निधी अभावी कामे रखडली 
सिंदखेड राजा विकास आराखड्यातील लखुजीराव जाधव राजवाडा, सावकार वाडा, रंग महाल निळकंठेश्वर मंदिरकाळा कोट या ठिकाणी 4 कोटी ते 5 कोटी रुपयांची कामे झालेली आहे. परंतु संबधित ठेकेदारांना 1.30 कोटी रुपये दिलेली आहे. त्यामुळे निधी उपलब्ध नसल्यामुळे ठेकेदारांने कामे सुरू केलेली नाही.त्यांच प्रमाणे सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तू मध्ये 3 ते 4 कोटी रुपयांचे कामांसाठी लागणारे साहित्य पडुन आहे. शासनाकडून निधी उपलब्ध नसल्यामुळे ऐतिहासिक वास्तूच्या कामे रखडली आहे, अशी माहिती नागपूर पुरातत्व विभागाचे अधिकारी जया वाहणे यांनी दिली आहे

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख