जयंत पाटील म्हणतात, "भाजपच्या आंदोलनाकडे फारसे लक्ष देत नाही..."  - Politic NCP state president Jayant Patil targets BJP | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटील म्हणतात, "भाजपच्या आंदोलनाकडे फारसे लक्ष देत नाही..." 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. 

सांगली : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले. आता मुंडे यांच्या विरोधातील तक्रार संबंधित महिलेने मागे घेतली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. झाडाचे पान का पडले म्हणूनही भाजपा आंदोलन करु शकते, असा टोलाही जयंत पाटील यांनी मुंडे प्रकरणावरुन भाजपाला लगावला आहे. वाळवा तालुक्यातल्या कुरळप येथे पी. आर. पाटील यांच्या अमृतमहोत्सव सत्कार सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  

जयंत पाटील म्हणाले "महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण मुळात आपण आधीपासून सांगत होतो, थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे, पोलिसांचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे, पोलीस जो निष्कर्ष काढतील त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजपा आंदोलन करु शकते, पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही" 

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलने आपली तक्रार मागे घेतली आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, “याप्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले. बातमी आल्यानंतर सगळ्या मीडियाने लावून धरली होती. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते. विरोधक या विषयाचा मुद्दा करतात. बहुजन समाजातून आलेल्या नेत्यांना त्रास झाला. धनंजय मुंडे यांना भयंकर त्रास झाला. पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. यापूर्वी राष्ट्रवादी युवकांची सुद्धा बदनामी केली, अशा आरोपामध्ये काही तथ्य समोर आले नाही”

अशा प्रकरणात घाई होते. या प्रकरणी सर्वांनी विचारा करावा, असे अजित पवार यांनी सांगितले. कोणावरही राजकीय सूडबुद्धीने कारवाई करु नये, असं अजित पवारांनी नमूद केलं. एखादा व्यक्ती राजकारणात, समाजकारणात काम करु लागला, तर त्याचं नाव लोकांत चांगलं होण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं, असे आरोप झाल्यावर एका झटक्यात माणूस बदनाम होतो, विरोधक बोट ठेवतात. महिला संघटना आंदोलनं करतात, राजीनामा मागितला जातो. ज्यांनी ज्यांनी ही मागणी केली, धनंजय मुंडें संबंधात वक्तव्य केली, माहिती न घेता मागणी केली, त्याला जबाबदार कोण ? असा सवाल अजित पवार यांनी केला. 

धनंजयला राष्ट्रवादीने संधी दिली, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. संधीचं सोनं केलं. विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताने निवडून आले. पंकजा मुंडेंसारख्या कॅबिनेट मंत्र्यांचा त्यांनी पराभव केला. पवारांनी महत्त्वाच्या खात्याचा भार दिला. ते काम करत होते. बहुजन समाजातून आलेला नेता, त्यांच्या मागे कुटुंब अक्षरश: पाच सहा दिवस अडचणीत आले. डिस्टर्ब झाले. याला कुणी वाली आहे की नाही. मुंडे कुटुंबाला ७-८ दिवस भयंकर त्रास सहन करावा लागला. राष्ट्रवादीला प्रश्न विचारले, राजीनाम्याची मागणी केली. मात्र, शरद पवारांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊ द्या असं आधीच सांगितलं होतं, असं अजित पवारांनी नमूद केलं. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख