मुंबई : पोलिसांनी सरकारचे दलाल असल्यासारखं वागू नये. सत्ता येते आणि सत्ता जाते…पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे. मनसेच्या कार्यकर्त्यांना तुम्ही कानाखाली मारलीत त्याचीही गरज नव्हती. एवढा माज दाखवू नका. पोलिसांनी सत्तेची दलाली करु नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे., त्यांनी व्हिडिओ शेअर करून वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक काय आहेत हे दाखवून देऊ असं आव्हान पोलिसांना केलं आहे.
काल वसई-विरार येथे एका कार्यक्रमात मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे संतप्त झाले आहे. त्यांनी या घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. पोलिस आयुक्तांनी संबधित पोलिसांना निंलबित करावे, अशी मागणी केली आहे.
काल वसई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांनी भेटण्यासाठी वेळ द्या, अशी मागणी यावेळी केली. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने मनसे कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढून मारहाण केली. दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आपल्या व्हिडोओमध्ये संदीप देशपांडे म्हणतात की जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज ठाकरेंची शिकवण आहे म्हणून ही गोष्ट सहन करतोय. ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लागेल हे पण लक्षात ठेवा..पोलिसांनी सत्तेची दलाली करु नये. एवढीच जर हिंमत असेल तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा….मग आम्ही दाखवतो राज ठाकरेंचे कट्टर मनसैनिक काय आहेत ते…
हेही वाचा : काँग्रेस प्रदेशाअध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार..
पुणे : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कोण्याच्या गळ्यात पडते, याकडे सगऴ्याचे लक्ष आहे. काँग्रेस प्रदेशाअध्यक्षपदाच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. काल रात्री उशिरापर्यंत मुंबईत याबाबत चर्चा सुरू होती. प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. काल या नावावर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या प्रमुख नेत्यांबरोबर याबाबत चर्चा केली.
कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर ही नावे समोर आली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या असल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा भार कमी करण्यात यावा, अशी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी तरुण नेत्याला संधी द्यावी. आम्ही त्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहू, असे थोरात यांनी सांगितले होते.

