पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की धनंजय मुंडे प्रकरणी वस्तूस्थिती न तपासता एखाद्याची बदनामी करणं चुकीचं आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासंदर्भात पुण्यात बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी कोरोना लसीकरण, सीरमची आग, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेप्रकरण, राजकारण्यांचे पक्षप्रवेश अशा विविध विषयांवर भाष्य केलं.
धनंजय मुंडे यांनी लग्नाचे आश्वासन दिले नाही आणि बलात्कारही केला नाही... #sarkarnama #sarkarnamanews @renusharma018 https://t.co/QjmQPgatD5
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 22, 2021
अजित पवार म्हणाले, आम्ही शक्ती कायदा आणतो आहे, यात अशी कुणी तक्रार केली तर ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, पण अशा प्रकरणात वस्तूस्थिती तपासणे गरजेचे आहे. असा घटना खूपच क्लेषदायक आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. मुंडेंची बदनामी झाली, त्यांच्या कुटुंबाला क्लेश सहन करावा लागला
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलने आपली तक्रार मागे घेतली आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, “याप्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले. बातमी आल्यानंतर सगळ्या मीडियाने लावून धरली होती. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते. विरोधक या विषयाचा मुद्दा करतात. बहुजन समाजातून आलेल्या नेत्यांना त्रास झाला. धनंजय मुंडे यांना भयंकर त्रास झाला. पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. यापूर्वी राष्ट्रवादी युवकांची सुद्धा बदनामी केली, अशा आरोपामध्ये काही तथ्य समोर आले नाही” अशा प्रकरणात घाई होते. या प्रकरणी सर्वांनी विचारा करावा, असे अजित पवार यांनी सांगितले. कोणावरही राजकीय सूडबुद्धीने कारवाई करु नये, असं अजित पवारांनी नमूद केलं.
एखादा व्यक्ती राजकारणात, समाजकारणात काम करु लागला, तर त्याचं नाव लोकांत चांगलं होण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं, असे आरोप झाल्यावर एका झटक्यात माणूस बदनाम होतो, विरोधक बोट ठेवतात. महिला संघटना आंदोलनं करतात, राजीनामा मागितला जातो. ज्यांनी ज्यांनी ही मागणी केली, धनंजय मुंडें संबंधात वक्तव्य केली, माहिती न घेता मागणी केली, त्याला जबाबदार कोण ? असा सवाल अजित पवार यांनी केला.
धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने संधी दिली, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. संधीचं सोनं केलं. विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताने निवडून आले. पंकजा मुंडेंसारख्या कॅबिनेट मंत्र्यांचा त्यांनी पराभव केला. पवारांनी महत्त्वाच्या खात्याचा भार दिला. ते काम करत होते. बहुजन समाजातून आलेला नेता, त्यांच्या मागे कुटुंब अक्षरश: पाच सहा दिवस अडचणीत आले. डिस्टर्ब झाले. याला कुणी वाली आहे की नाही. मुंडे कुटुंबाला ७-८ दिवस भयंकर त्रास सहन करावा लागला. राष्ट्रवादीला प्रश्न विचारले, राजीनाम्याची मागणी केली. मात्र शरद पवारांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊ द्या असं आधीच सांगितलं होतं, असं अजित पवारांनी नमूद केलं.
Edited by : Mangesh Mahale

