पोलिसांनो, तुमच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राची शान वाढली  (व्हिडिओ) - Police, your performance has enhanced the pride of Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांनो, तुमच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राची शान वाढली  (व्हिडिओ)

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

उत्कृष्ट तपास केल्याबद्दल राज्याच्या पोलिस दलातील 10 अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला विशेष पोलिस पदक जाहीर झाले होते. त्याबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविला.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विशेष पोलिस पदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील 10 अधिकाऱ्यांशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संवाद साधला. "या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिस दलाची मान उंचावली आहे, शान वाढवली आहे. त्याबद्दल सन्मानित पोलिस अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन,' अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी या पोलिसांचे कौतुक केले. 

उत्कृष्ट तपास केल्याबद्दल राज्याच्या पोलिस दलातील 10 अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला विशेष पोलिस पदक जाहीर झाले होते. त्याबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविला. या वेळी या अधिकाऱ्यांनी तपास कार्यातील त्यांचे अनुभव कथन केले. 

देशमुख म्हणाले "या पोलिस अधिकाऱ्यांशी साधलेला संवाद हा उत्साह वाढविणारा आणि चैतन्य निर्माण करणारा होता. या अधिकाऱ्यांनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिस दलाची मान उंचावली आहे.' सन्मानित पोलिस अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करत गृहमंत्र्यांनी त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहीत केले. 

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका केली जात होती. विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना मुंबई पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. 

बिहारच्या पोलिस महासंचालककडून थेट मुंबई पोलिसांवर हल्ला केला जात होता. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन तो सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी बिहार पोलिसांनी केली होती. त्यावरून राज्यातही राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले होते. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट तपासाबद्दल राज्यातील 10 पोलिस अधिकाऱ्यांना विशेष पदके जाहीर झाली. त्याचा आधार घेत कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेली पदके महाराष्ट्र पोलिस दलासाठी नक्कीच सुखावह आहेत. 

हेही वाचा : आत्महत्या करण्यापूर्वी सुनीलने माझ्याशी बोलायला हवे होते 

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवटचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख सुनील ईरावर यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहित आत्महत्या केली होती. कार्यकर्त्याच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त करत ठाकरे यांनी सोमवारी (ता. 17 ऑगस्ट) सुनील यांचे भाऊ अनिल यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधून ईरावर कुटुंबीयांचे सांत्वन केले. ईरावर कुटुंबीयांना धीर देत भेट घेण्यासाठी येईल, असेही सांगितले. 

"राजसाहेब मला माफ करा, आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टींवर राजकारण चालते आणि दोन्ही गोष्टी आमच्याकडे नाहीत, त्यामुळे मी जीवन संपवत आहे,' अशा भावना मांडणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहित सुनील ईरावार (वय 30) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख