मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याऱ्या विहिंपच्या कार्यकर्त्यास पोलिस कोठडी - Police remand to Barshi activist for challenging CM Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याऱ्या विहिंपच्या कार्यकर्त्यास पोलिस कोठडी

प्रशांत काळे 
शनिवार, 17 जुलै 2021

मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पाय ठेवू देणार नाहीत

बार्शी  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या  Ashadi Ekadashi महापुजेला चॅलेंज देण्याऱ्या बार्शीच्या Barshi कार्यकर्त्यास पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  

सतिष आरगडे (रा. तावडी ) असे पोलिस कोठडी मिळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अजिंक्य पिसे यांनी आरगडे यांच्यासह पाच जणांवर बार्शी शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. बारामती सहकारी बँकेस जमिन तारण असताना बँकेचे लेटर पॅड, शिक्के, हरकत दाखला बनावट तयार करुन कागदपत्रांच्याआधारे बेकायदा हस्तांतर दस्त तयार करुन फसवणूक केली असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांची मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, पंढरपूर येथे महापूजेला येऊ नये, मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पाय ठेवू देणार नाहीत, अशी माहिती पंढरपुरात प्रसिद्धी माध्यमांना देऊन चॅलेंज देणाऱ्या बार्शीच्या कार्यकर्त्यास बार्शी पोलिसांनी फसणुकीच्या गुन्ह्यात संशयीत आरोपी म्हणून अटक केली आहे. त्याला  न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सूनावली.

विश्व हिंदू परिषद विभागमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या सतीष आरगडे याने 14 जुलै रोजी पंढरपूर येथे प्रसिद्धी माध्यमांची बैठक घेतली. यावेळी जोगदंड महाराज (भक्ती मार्ग पंढरपूर), भाग्यश्री लेणे विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र साळे (रा. इसबावी ता.पंढरपूर), नितीन शिंदे उपस्थित होते. यावेळी आरगडे यांनी महाराष्ट्र भूमी ही संतांची पवित्र भूमी आहे, पंढरपूर आषाढी वारीसाठी पायी चालत येण्याची परंपरा आहे, ही परंपरा सातशे वर्षांपासून चालत आली आहे. इंग्रजांच्या काळात ही खंडीत झाली नाही.आघाडी सरकारने खंडीत करण्याचे पाप केले आहे, असे म्हटलं होते. 
   
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेत ठेवले असून त्यांना सोडून वारी करु दिली पाहिजे व मुख्यमंत्री यांनी नैतिक जबाबदारी म्हणून प्रायश्चित्त म्हणून बंडातात्या कराडकर यांची माफी मागावी, एकादशीच्या महापूजेला येऊ नये, आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर विश्वहिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला होता.

पंढरपूर पोलिसांनी बार्शी पोलिसांना ही माहिती कळवताच सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी आरगडे याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करुन बार्शी न्यायालयात हजर करताच न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर कार्यकर्ता, बार्शी, तावडी येथे घर, मराठा आरक्षण मध्ये सक्रिय, एसटीची तोडफोड, जाळपोळ आदी कृत्याचे गुन्हे आरगडेवर दाखल असून कारवाई केली असल्याचा अहवाल पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पोलिस अधिक्षकांना दिला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख