पोलिस अधिकारी सरकार पाडणार होते.. असं मी म्हणालोच नाही : गृहमंत्री  - Police officers were going to overthrow the government  I did not say that  Home Minister | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस अधिकारी सरकार पाडणार होते.. असं मी म्हणालोच नाही : गृहमंत्री 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 सप्टेंबर 2020

"काही पोलिस अधिकारी सरकार पाडणार होते, असे मी म्हणालो नाही. ते वक्तव्य खोटे आहे, माझ्या तोंडी 'ते' शब्द टाकण्यात आले," असा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

मुंबई :  "काही पोलिस अधिकारी सरकार पाडणार होते, असे मी म्हणालो नाही. ते वक्तव्य खोटे आहे, माझ्या तोंडी 'ते' शब्द टाकण्यात आले," असा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. काल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काही पोलिस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, तो हाणून पाडला, असं व्यक्तव्य देशमुख यांनी केल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी हा खुलासा केला आहे.  

पुण्याचे नवे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोठी चुक केली होती. त्यांचे समर्थन करणार नाही. त्यांना काहीतरी जबाबदारी द्यायची म्हणून त्यांच्यावर पुणे पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी दिली असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकार साडेबारा हजार पोलिसांची भरती करणार आहे, या भरती प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा प्रश्न येणार नाही. मराठा आरक्षणाच्या 13 टक्के जागा बाजूला ठेवून ही भरती होईल. कोरोनाशी मुकाबला करताना आतापर्यंत 208 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमूखी पडलेल्या पोलिसांना 65 लाखांची मदत करण्यात आली असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे. 
  
एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांसह चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही वेळीचं तो हाणून पाडला, असा गैाप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता. त्यानंतर देशमुख यांनी या वृत्ताचे खंडण केलं आहे. "तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करून आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे प्रकार समोर आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे प्रकरण योग्य पद्धतीनं मार्गी लावलं," असं देशमुख यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्ह्टलं होतं. 
 
अमिताभ गुप्ता या पोलिस अधिकाऱ्यांनी येस बँक घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह २२ जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी कडक लॉकडाउनच्या सुरुवातीच्या टप्प्यात संमतीपत्र दिले. त्याच्यामुळे सरकार अडचणीत आले होते. अमिताभ गुप्ता यांना आता पुण्याचे आयुक्त केले आहे. याविषयी विचारलं असता देशमुख म्हणाले की अमिताभ गुप्ता यांच्या हातून त्यावेळी ही मोठी चूक झाली होती. याबाबत गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर जाहीर कबुलीही दिली आहे. पण आतापर्यंतची त्यांची चांगली कारकिर्द लक्षात घेता त्यांना पुण्याची जबाबदारी दिली आहे, असं देशमुख यांनी मुलाखतीत म्हटल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आलं होतं.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख