गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण : आमदार बनसोडेंसह मुलगाही अडचणीत येण्याची चिन्हे - Police files FIR against son of MLA Anna Bansode for abduction and attempt to murder | Politics Marathi News - Sarkarnama

गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण : आमदार बनसोडेंसह मुलगाही अडचणीत येण्याची चिन्हे

उत्तम कुटे
गुरुवार, 13 मे 2021

गोळीबाराच्या पुराव्यांचा पोलिसांकडून शोध... 

पिंपरी : पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात बुधवारी (ता.१२)झालेल्या गोळीबाराच्या घटनेला आता नवे वळण मिळाले आहे. कारण या एका प्रकरणातून एक,दोन नव्हे, तर तीन खूनाचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ (Sidharth Bansode) याच्याविरुद्ध गोळीबार केलेल्या तानाजी पवारच्या जोडीने तो काम करीत असलेल्या ए.जी. एन्व्हायरो इंन्फ्रा प्रा. लि. या कंपनीनेही खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. (Firing on MLA  Anna Bansode in Chinchwad) गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या पवारवर खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा आणि सिद्धार्थ बनसोडेवर खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. (Attempt to murder fir against Sidharth Bansode)

दरम्यान,एका घटनेत परस्परविरोधी दोन नव्हे, तर तीन गुन्हे दाखल झाल्याने पोलिसांपुढे कारवाईचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे सखोल चौकशीनंतरच त्यांनी अटकेची कारवाई या तिन्ही गुन्ह्यात करण्याचे ठरवले आहे. तसेच राज्यातील सत्ताधारी आमदारांचा मुलगा दोन गुन्ह्यांत आरोपी असल्याने ही कारवाई करताना त्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. परिणामी, त्यांनी आस्ते कदम जाण्याचे ठरवले आहे. ठोस पुरावे मिळाल्यानंतरच अटकेची कारवाई केली जाणार आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानेच सांगितले.

ही पण बातमी वाचा : पिंपरीमध्ये नक्की काय घडले?

पोलिसांत दाखल झालेल्या तिन्ही एफआयआरचा घटनाक्रम पाहिला,तर आमदारांच्या कार्यालयातील गोळीबाराची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली आहे. तर,त्याअगोदर सकाळी ११ वाजता हा गोळीबार करणारा माजी सैनिक तानाजी पवार याला त्याच्या आकुर्डीच्या कार्यालयातून आमदारांच्या दोन कार्यकर्त्यांनी उचलून (अपहरण) आमदारांच्या चिंचवडच्या कार्यालयात आणले. तेथे त्यांचा मुलगा सिद्धार्थ व इतरांनी त्याला बेदम मारहाण केली. सिद्धार्थने चॉपर डोक्यात मारून जीव घेण्याचा प्रयत्न केला, असे तानाजीने फिर्यादीत म्हटले आहे. त्यात जखमी असलेल्या पवारवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे या गुन्ह्याचे तपासाधिकारी नाईकवडी यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

तर, आमदारांचा कार्यकर्ता सावनकुमार सलादल्लू (वय ४८, रा.चिंचवड) याने या प्रकरणी पवार व त्याचे सहकारी संकेत जगताप व श्रीनिवास बिरादार यांच्याविरुद्ध `क्रॉस कंप्लेट` दिली आहे. त्यानुसार पिंपरी पालिकेने शहरातील कचरा गोळा करण्याचे काम दिलेल्या अन्थोनी यांच्या कंपनीने (ए.जी.एन्व्हायरो) स्थानिक तरुणांना काम द्यावे, या मागणीसाठी आरोपींना चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी शिवीगाळ करीत पवारने आमदार व त्यांच्या मुलांच्या दिशेने गोळीबार केला. या घटनेप्रकरणी सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाले असून त्याआधारे तसेच दोन्ही गटांपैकी कोण खरं बोलत आहे, त्याची खातरजमा करून अटकेची पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी आज सरकारनामाच्या प्रतिनिधीला सांगितले.

या गोळीबारप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केल्यानंतर याच घटनेप्रकरणी तिसरा असाच गुन्हा निगडी या शहरातील दुसऱ्या पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. पवार काम करीत असलेल्या कंपनीतील स्वाती कदम (वट ३९,रा. फुरसुंगी) ही महिला कर्मचारी त्यात फिर्यादी आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सिद्धार्थ बनसोडे व इतर नऊ जण दोन मोटारी आणि एका मोटरसायकलवरून आकुर्डीतील आमच्या कार्यालयात बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता घुसले. त्यांनी धनराजे बोडसे व अमोल कुचेकर यांनिा मारहाण करीत मॅनेजर तानाजी पवार कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर माहित नाही,असे सांगताच त्यांनी आयटी एक्झिक्युटीव्ह विनोदकुमार रेड्डी याच्या डोक्यावर टॉमीने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. कामगार गोकर्ण याला ढकलून जखमी केले. नंतर तानाजीच्या नावे शिवीगाळ करीत धमकावत ते निघून गेले. या गुन्ह्यातही हाती लागलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. त्यातून कोण दोषी हे सिद्ध झाल्यानंतर अटकेची कारवाई केली जाईल, असे तपासाधिकारी व निगडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक खराडे यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख