शिवसेना आमदारांकडून राष्ट्रवादीच्या नेत्याचे कोैतुक..पोलिस कुटुंबियांना न्याय - The police family got justice because of Awhad  :  Saranaik  | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना आमदारांकडून राष्ट्रवादीच्या नेत्याचे कोैतुक..पोलिस कुटुंबियांना न्याय

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

आव्हाडामुळेच पोलिस कुटुंबियांना न्याय मिळाला, याचा आपणाला अभिमान आहे, असे गौरवउद्धगार ओवळा-माजीवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी काढले.  

ठाणे : वर्तकनगर येथील पोलिस वसाहतीचा पुन:र्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आगामी तीन वर्षात या इमारतींचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. 

दरम्यान, गेली 9 वर्षे तीन सरकारांकडे पाठपुरावा केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गेलेला हा प्रश्न त्यांनी अवघ्या पहिल्याच बैठकीत मार्गी लागला. आव्हाडामुळेच पोलिस कुटुंबियांना न्याय मिळाला, याचा आपणाला अभिमान आहे, असे गौरवउद्धगार ओवळा-माजीवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी काढले.  

गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलिस वसाहतीच्या पुन:र्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी बोलावल्या पत्रकार परिषदेत आव्हाड आणि सरनाईक बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हेदेखील उपस्थित होते. 

गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईक वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुन:र्विकासासाठी पाठपुरावा करीत होते. त्यांनी आपणाशी चर्चा केल्यानंतर आपण हा प्रश्न धसास लावला. योगायोगाने आपण या खात्याचे मंत्री असल्याने त्यांच्या या पाठपुराव्याला पूर्णविराम लावणे मला शक्य झाले. हा पुन:र्विकास कोणी करावा, या मुद्यावर अनेकांचा विरोध होता.

मात्र, आपण हा विरोध झुगारुन हा भूखंड हा म्हाडाचा असल्याने म्हाडाच्या वतीनेच पुन:र्विकास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार 567 घरे ही पोलिसांना देण्यात येणार असून उर्वरित घरांपैकी आणखी 10 टक्के घरे पोलिसांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहेत. अन्य 10 टक्के घरे ही शासकीय कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. लवकरच या पुन:र्विकासासाठी वास्तूविशारद- अभियंते यांच्यासोबत आराखडा तयार करुन आगामी तीन वर्षात हे काम पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. 

यावेळी सरनाईक यांनी, गेल्या 9 वर्षांपासून आपण वर्तक नगरमधील पोलीस वसाहतीच्या पुन:र्विकासासाठी प्रयत्नशील होतो. इमारती धोकादायक झाल्यामुळे  येथील अनेक कुटुंबांचे रेंटल हाऊसिंगमध्ये स्थलांतर करण्यात आलेला आहे.   

फडणवीस सरकारच्या काळातही आश्वासने देण्यात आली होती. मात्र, गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांच्याशी महिन्याभरापूर्वी पत्रव्यवहार केला. त्यांनीही म्हाडा आणि गृहखात्याची संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न तत्काळ मार्गी लावला. एकाच बैठकीमध्ये त्यांनी येथील पुन:र्विकासाला मान्यता दिली. या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसाठी गेस्ट हाऊस, हॉल, क्लब हाऊस आदींची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. 

दो हंसो जोडा पुन्हा एकत्र

प्रताप सरनाईक यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांचे चित्रशिल्प देऊन जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच, या वसाहतीमध्ये राहणार्‍या पोलिसांच्या पत्नींनीदेखील  आव्हाड यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. मात्र तब्बल बारा वर्षानंतर आव्हाड आणि सरनाईक एकाच राजकीय व्यासपीठावर दिसले. सरनाईक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ काढून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते. शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. ही जोडी फुटल्यावर दो हंसो का जोडा बिछड गयाची उपमा दिली गेली होती. आता महाविकास आघाडीचे सरकार असल्याने एक तपानंतर हे मित्र एकाच व्यासपीठावर दिसले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख