लस घेऊनही अँटीबॅाडी नाहीत! 'सिरम'च्या अदर पूनावालांविरोधात पोलिसांत तक्रार - Police complaint againt Adar Poonawalla in Lucknow | Politics Marathi News - Sarkarnama

लस घेऊनही अँटीबॅाडी नाहीत! 'सिरम'च्या अदर पूनावालांविरोधात पोलिसांत तक्रार

वृत्तसंस्था
सोमवार, 31 मे 2021

कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केले आहे.

लखनऊ : कोविशिल्ड लशीचा पहिला डोस घेतल्यानंतरही शरीरात अॅंटीबॅाडी तयार झाल्या नसल्याचा दावा लखनऊमधील एका व्यापाऱ्याने केला आहे. याविरोधात त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. (Police complaint againt Adar Poonawalla in Lucknow)

प्रताप चंद्र असे तक्रारदाराचे नाव आहे. पूनावाला यांच्याप्रमाणेच त्यांनी औषध महासंचालक, केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अगरवाल, ICMR चे संचालक बलराम भार्गव, राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक अपर्णा उपाध्याय यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लखनऊमधील आशियाना पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.

हेही वाचा : लोकसंख्या वाढवण्यासाठी जोडप्याला तीन मुलं जन्माला घालण्याची परवानगी

कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केले आहे. सिरम इन्स्टिट्युटकडून ही लस उत्पादित केली जात आहे. प्रताप चंद्र यांनी 8 एप्रिल रोजी कोविशिल्ड ही लस घेतल्याच्या तक्रारीत म्हटलं आहे. दुसरा डोस 28 दिवसांनी मिळणं अपेक्षित होतं. पण दोन डोसमधील कालावधी वाढवण्यात आला. पण पहिला डोस घेतल्यानंतर प्रकृती बिघडली. बलराम भार्गव यांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटीबॅाडी तयार होत असल्याचे म्हटले होते, असे तक्रारीत नमुद करण्यात आलं आहे.

प्रताप चंद्र यांनी कोविड अॅंटीबॅाडी टेस्ट केल्यानंतर त्यात अँटीबॅाडी विकसित न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. याउलट प्लेटलेट्स तीन लाखांवरून दीड लाखांपर्यंत कमी झाल्या, असे त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली असली तरी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. ही तक्रार संवेदनशील असल्याने वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरची पुढील कार्यवाही केली जाईल, असे पोलिसांनी म्हटलं आहे. तक्रारदार प्रताप चंद्र यांनी गुन्हा दाखल न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना लशीचे 23 कोटी डोस पुरवले आहे. त्यापैकी 21 कोटी 31 लाख डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. 18 ते 44 वयोगटातील 1 कोटी 89 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यांना पुढील तीन दिवसांत 2 लाख 37 हजार डोस पुरवले जातील. सध्या राज्यांकडे सुमारे पावणे दोन कोटी डोस शिल्लक असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख