पंकजांना नाराजीमुळे खास निमंत्रण नाही... पंतप्रधानांच्या बैठकीचे आधीच नियोजन

मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजांना बोलावून घेतल्याच्या वृत्ताने गोंधळ
modi-pankaja
modi-pankaja

नवी दिल्ली : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांचा दिल्ली दौरा आज चांगलाच गाजला. त्या नाराज असल्याने पंतप्रधानांनी त्यांना खास बोलविले असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले. मात्र भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची (National secretary of BJP)  बैठक ही एक महिना आधीच नियोजित होती. त्याचा आणि मंत्रीमंडळ विस्तारामुळे (Modi Cabiner Expansion) नाराज झालेल्यांची समजूत असा काही संबंध नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले.

भगिनी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात न घेतल्याने नाराज असल्याचे सांगितले जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. माजी मंत्री विनोद तावडे आणि महिला आघाडीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासह इतरही राष्ट्रीय सचिव त्यांच्यासोबत होते. पंतप्रधानांनी पंकजा मुंडे यांना स्वतंत्ररीत्या भेट दिली नसून राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांनाच पंतप्रधान यांनी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. 

पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप संघटनेची नवीन टिम तयार झाली आहे. यातील सरचिटणीस आणि उपाध्यक्ष पदावरील नेत्यांशी पंतप्रधानांची चर्चा झाली होती. राष्ट्रीय सचिवांशी चर्चा राहिली होती. कोरोना आणि मंत्रीमंडळ विस्तारामुळे या बैठका लांबल्या होत्या. या बैठकांचे नियोजन आधीच झालेले होते. त्यानुसार तेरा राष्ट्रीय सचिवांना आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी आममंत्रित करण्यात आले होते. 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. त्यात महाराष्ट्रातून डॉ. भागवत कराड आणि डॉ. भारती पवार या नवोदितांना मोदी यांनी संधी दिली. संभाव्य नावांमध्ये पंकजा यांच्या भगिनी आणि खासदार प्रीतम मुंडे यांचेही नाव होते. त्यांचा समावेश मंत्रिमंडळात न झाल्याने मुंडे भगिनी नाराज आहेत असे सांगितले जाते. पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ‘आम्ही नाराज नाही, कार्यकर्ते नाराज आहेत’ असे सांगितले होते. त्यानंतर बीडमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.

या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आज राष्ट्रीय सचिवांच्या यांच्या बैठकीसाठी दिल्लीत आल्याने प्रसार माध्यमांना आयते खाद्य मिळाले. या बैठकीनंतर पंकजा या भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटल्या. त्यानंतर तावडे आणि रहाटकर यांच्यासह आज संध्याकाळी त्या पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी रवाना झाल्या. पंतप्रधानांनी बैठकीसाठी आलेल्या राष्ट्रीय सचिवांची भेट घेतली. त्यातच पंकजा यांचा समावेश होता. त्यांना एकटीला पंतप्रधान यांनी वेळ दिलेली नाही. मात्र बैठकीनंतर दोघांमध्ये काही चर्चा झालेली असू शकते असे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com