पावती फाडा नाहीतर कार जप्त करू! थेट पंतप्रधान मोदींच्या बंधूंशीच घेतला पंगा

अहमदाबादमधील सरदार पटेल विमानतळ परिसरात हा प्रकार घडला आहे.
PM Narendra modi brother prahlad modi Faces parking charge issue
PM Narendra modi brother prahlad modi Faces parking charge issue

अहमदाबाद : रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगवरून वाहनचालक आणि पार्किंग ठेकेदारांच्या कमर्चाऱ्यांमध्ये अनेकदा वादविवाद होतात. वाहतूक पोलिस अन् वाहन चालकांमध्येही थेट मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्या आहेत. पण यावेळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्येष्ठ बंधूंशीच पार्किंग कर्मचाऱ्याने पंगा घेतल्याचे समोर आले आहे. पार्किंगची पावती फाडली नाही तर थेट कार जप्त करण्याचा इशाराही या कर्मचाऱ्याने त्यांना दिला. 

अहमदाबादमधील सरदार पटेल विमानतळ परिसरात हा प्रकार घडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्येष्ठ बंधू प्रल्हाद मोदी मंगळवारी सायंकाळी हरिद्वारहून अहमदाबाद विमानतळावर आले होते. त्यांची कार विमानतळाच्या पार्किंगबाहेर रस्त्याच्या कडेला उभी होती. चालक त्यांची वाट पाहत थांबला होता. यावेळी पार्किंगमधील कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे पार्किंगचे 90 रुपये शुल्क मागितल्याचा दावा प्रल्हाद मोदी यांनी केला आहे.

मोदी यांच्या म्हणण्यानुसार, कार रस्त्याच्या कडेला उभी असताना पार्किंग शुल्क मागण्यात आले. त्यामुळे शुल्क देण्यास नकार दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यासोबत वाद सुरू झाला. याचवेळी विमानतळ व्यवस्थापनातील काही अधिकारी याठिकाणी पोहचले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्याला चूक लक्षात आणून देत मोदींना जाण्यास सांगितले. 

हा वादविवाद सुरू असताना संबंधित कर्मचाऱ्याने शुल्क न भरल्यास थेट कार जप्त करण्याचा इशारा प्रल्हाद मोदींना दिला. परिसरात थांबलेल्या प्रत्येक वाहनाकडून शुल्क घेतो. त्यामुळे तुम्हाला पावती फाडावी लागेल. पावती फाडली नाही तर कार जप्त करू, असे हा कर्मचारी म्हणाला. 

अहमदाबाद विमानतळ अदानी ग्रुपकडे

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अहमदाबाद विमानतळासह लखनऊ विमानतळ आणि मंगलुरू विमानतळ अदानी ग्रुपला चालविण्यासाठी दिले आहे. पुढील 50 वर्षांसाठीचा करार करण्यात आलेला आहे. त्यानंतर अहमदाबाद विमानतळावर पार्किंग शुल्क आकारण्यास सुरूवात झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी टर्मिनल बिल्डींग टी-1 व टी-2 बाहेरील मोकळ्या मैदानात मोफत पार्किंग सुविधा होती. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com