पिंपरी चिंचवडच्या कमी मतदानाचा फटका कुणाला... - Pimpri-Chinchwad's low turnout has been a hot topic in political circles | Politics Marathi News - Sarkarnama

पिंपरी चिंचवडच्या कमी मतदानाचा फटका कुणाला...

उत्तम कुटे
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडला, तर ते २९ टक्केच आहे. गेल्यावेळपेक्षा ते जास्त आहे. पण, ते यावेळी पन्नास टक्के होईल या अपेक्षेपेक्षा कमी आहे.

पिंपरी : विधानपरिषद निवडणुकीत मतदान वाढल्याचा फायदा कोणाला होणार, अशी चर्चा राज्यात असताना, पिंपरी चिंचवडमध्ये, मात्र तुलनेने व अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार हीच चर्चा निकालाच्या दिवशी आहे.

पुणे शिक्षकपेक्षा पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निकालाविषयी अधिक उत्सुकता व चर्चा उद्योगनगरीत आहे. कारण याच मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आहेत. शिक्षकमतदारसंघामध्ये भाजपने शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. 

पुणे पदवीधरमध्ये ५८.९६ टक्के मतदान झाले असले, तरी पुणे जिल्ह्यात ते ४४.९५ टक्केच झालेले आहे. आणि पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडला, तर ते २९ टक्केच आहे. गेल्यावेळपेक्षा ते जास्त आहे. पण, ते यावेळी पन्नास टक्के होईल या अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे शहराचे मतदान निर्णायक ठरेल, हा केलेला भाजपचा दावा फोल ठरणार आहे. मतदारसंघाच्या शहरी भागात कमी,तर ग्रामीण भागात ते अधिक झाले आहे. शहरी भागात जास्त मतदान झाले, तर त्याचा भाजपला फायदा होतो, असा या पक्षाचा दावा आहे. तर ,ग्रामीण भागातील अधिक मतदान हे आम्हाला फायदेशीर ठरते, असे राष्ट्रवादी तथा महाविकास आघाडीचे म्हणणे आहे. हा निकष विचारात घेतला, तर राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांचे पारडे जड दिसते आहे, असे असताना भाजपसह राष्ट्रवादीनेही येथे विजयाचा दावा केला आहे. कोणाचा दावा खरा ठरतो, हे आज स्पष्ट होणार आहे. 
 
शिक्षक मतदारसंघ : निवडणूक आयोगाकडे उमेदवाराची तक्रार
 
पिंपरी : "शिक्षण संस्थाचालकांच्या हस्तक्षेपामुळे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही 'फ्री अँड फेअर' होऊ शकली नाही," असा दावा या निवडणुकीतील एका अपक्ष उमेदवारानेच केला आहे. तशी तक्रारच त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या निवडणुकीवर स्वतःचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिक्षण संस्थांनी (काही अपवाद) शिक्षकांच्या स्वतंत्र मीटिंग घेऊन यानांच मते द्या, असा सूचनावजा धमकी आदेश काढला होता. विधिमंडळात राजकीय बलाबल वाढावं या हेतूने संस्थाचालक आणि राजकीय पक्ष यांच्या युतीतून लढणारा प्रवाह यावेळी अधिक ठळकपणे जाणवला. पहिल्यांदा राजकीय पक्षांचा हस्तक्षेप मोठा वाढल्याचे पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रकाश पवार यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख