राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक..भाजप उपमहापौरांच्या केबिनमध्ये घुसून निषेध.. - Pimpri Chinchwad ncp Nationalist congress bjp deputy Mayor Keshav Gholave protest | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक..भाजप उपमहापौरांच्या केबिनमध्ये घुसून निषेध..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

भाजपचे उपमहापौर केशव घोळवे यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्यांच्या महापालिका कार्यालयात घुसून आज निषेध केला.

पिंपरी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात तीनशे रुपये भाड्याची माणसं असून या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानमधून रसद पुरवठा होत असल्याचा खळबळजनक आरोप काल महापालिका सभेत करणारे भाजपचे उपमहापौर केशव घोळवे यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्यांच्या महापालिका कार्यालयात घुसून आज निषेध केला. यावेळी घोळवे केबिनमध्ये नसल्याने त्यांच्या खुर्चीला पालेभाज्या फळांचा हार घालून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गांधीगिरी केली.

राष्ट्रवादी युवकचे प्रमुख पदाधिकारी काल दुपारी घोळवेंच्या दालनात दाखल झाले. त्यांनी काल सर्वसाधारण सभेत शेतक-यांचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी व घोळवे यांनी देशातील शेतक-यांची माफी मागण्यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलन केले.नंतर उपमहापौरांच्या खुर्चीस पालेभाज्या व फळांचा हार घालून घोळवे यांचा निषेध करण्यात आला. विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्ष प्रसाद कोलते, निखिल दळवी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे तसेच सनी डहाळे, अक्षय माचरे, अशोक भडकुंबे, मनजितसिंह कोहली, सोनू बोदडे, श्री सोनिगिरा, प्रतिक साळुंखे आदींनी या आंदोलनात भाग घेतला.

दरम्यान, सभ्य संस्कृतीचा आणि शेतकरी आंदोलनाचा अपमान करणारे वक्तव्य केल्याबदल घोळवेंनी माफी मागावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही केली आहे. वाचाळ संस्कृतीचे प्रदर्शन केलेल्या या कलियुगातील रामभक्ताने अभंगगाथा आणि ज्ञानेश्वरीचे पारायण करावे, असा सल्ला माकपचे कार्यालयीन सचिव क्रांती कुमार कडूलकर यांनी दिला आहे.

मनसेने दिला परप्रांतीय फेरीवाल्याला चोप..

बदलापूर : बदलापूर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एका परप्रांतीय फेरीवाल्याला चोप दिला आहे.चोप देतांनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बदलापूरच्या बेलवली भागात एका मराठी महिलेने खाद्यपदार्थाची हातगाडी लावली होती. मात्र, इथे खाद्यपदार्थाची गाडी लावणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याने माझी गाडी इथे लागते तुम्ही कोणी लावायची नाही, अशी दमदाटी या महिलेला केली. दरम्यान बदलापूर मनसेचा महिला कार्यकर्त्यांना ही बाब समजताच त्यांनी या फेरीवाल्याचा समाचार घेत त्याला चोप दिला. याप्रकरणी कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख