लोणावळ्याची चिक्की नाना पटोलेंना बाधली... त्या वक्तव्यावरून घूमजाव - Phone tapping statement withdrawn By Nana Patole | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

लोणावळ्याची चिक्की नाना पटोलेंना बाधली... त्या वक्तव्यावरून घूमजाव

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

महाविकास आघाडीत वाद...

मुंबई ः काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लोणावळ्यात केलेले वक्तव्य चांगलेचे महागात पडले असून महाविकास आघाडीत या वक्तव्यावरून ठिणगी पडल्याने त्यांना माघार घ्यावी लागली आहे. लोणावाळ्यातील काॅंग्रेसच्या शिबिरात त्यांनी आपल्यावर हे सरकार पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून राजकीय धुरळा उडाला आणि शिवसेना व राष्ट्रवादीने नानांच्या वक्तव्याबद्दल नाराजी जाहीररित्या नोंदवली.

दोन पक्षांच्या नाराजीनंतर पटोले हा आरोप राज्य सरकारवर नसून केंद्र सरकारवर केल्याचे सांगत घूमजाव केले.

पटोले म्हणाले, ‘‘त्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ माध्यमांकडून लावला जात आहे. माझे आरोप राज्य सरकारवर नसून केंद्र सरकारवर होते. माझा राज्य सरकारवर कोणताही आरोप नसून याबाबत मी लवकरच भूमिका स्पष्ट करेन.’’ आघाडीचे सरकार भक्कम असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिले. मात्र पक्ष विस्तार करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे होत नसून निधीही मिळत नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ते स्वतः यामध्ये लक्ष घालणार असल्याचे पटोले यांनी सांगत या प्रकरणावर पडदा टाकला.

वाचा ही बातमी : पटोलेंची स्वतःच्या सरकारवरच फोन टॅपिंगचा आरोप

पंकजा मुंडे यांनी भाजपचा त्याग करावा का?

आधी माहिती घ्यावी : मलिक
नाना पटोले यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील तीव्र नापसंती व्यक्त केल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी याविषयी, नाना पटोले यांनी माहितीच्या अभावी आरोप केला असल्याचा टोला हाणला.

काय म्हणाले होते पटोले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी असल्याचे सोनिया गांधींनी सांगितले आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद त्यांच्याकडे आहे.”

‘‘महाराष्ट्रात काँग्रेस उभी होत असल्याचे त्यांना माहिती आहे. आयबीचा अहवाल रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही अहवाल गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे,” असे वक्तव्य करत नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख