पेट्रोल दरवाढीतून झालेल्या 'वरकमाई'चा हिस्सा जनतेला द्या : शिवसेना - petrol diesel price hike shivsena criticized modi government    | Politics Marathi News - Sarkarnama

पेट्रोल दरवाढीतून झालेल्या 'वरकमाई'चा हिस्सा जनतेला द्या : शिवसेना

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारसमोर आर्थिक आव्हान आहे हे खरे असले तरी सामान्य जनतेचे कंबरडे मोडून देशाचा आर्थिक कणा कसा ताठ होणार आहे?

मुंबई : "जनतेला काही पैशांचा ‘दिलासा’ देण्याऐवजी वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड दरवाढीतून केंद्र सरकारला जी ‘वरकमाई’ झाली आहे, त्यातील काही हिस्सा जनतेला द्या. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले म्हणून आपल्या देशात इंधन दरकपात झाली आहे. आसाम- प. बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत इंधन महागाईच्या ‘फोडणी’चा ठसका लागू नये यासाठीही केंद्र सरकारची ही दरकपातीची मखलाशी असू शकते," अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.
कोरोना, लॉक डाऊन, कोसळलेली अर्थव्यवस्था याचा पाढा आजही वाचला जात आहेच. अशा वेळी केंद्राच्या तिजोरीत इंधन दरवाढीमुळे जी ‘बेरीज’ होत आहे ते गणित कशासाठी मोडायचे, असाही हिशेब केंद्राच्या पातळीवर सुरू असू शकतो. 1 जानेवारी 2020 ते मार्च 2020 या काळात केंद्र सरकारला प्रतिलिटर पेट्रोलमागे 20 रुपये आणि डिझेलमागे 16 रुपये महसूल मिळत होता. आता हेच आकडे 33 आणि 32 रुपये असे झाले आहेत. म्हणजे सरकारची प्रतिलिटर कमाई 13 आणि 16 रुपयांनी वाढली आहे, पण जनतेच्या खिशाचे काय? प्रत्येक लिटरमागे त्याचा खिसा 13 आणि 16 रुपयांनी रिकामा होत आहे याचा विचार कोणी करायचा? आता केंद्र सरकार म्हणेल की, वाचविले की त्यांचे 39 आणि 37 पैसे! प्रश्न ही इंधन स्वस्ताई किती काळ टिकणार हा आहे, असे अग्रलेखात नमूद केलं आहे.  

काय म्हटलं आहेत 'सामना'च्या अग्रलेखात

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारसमोर आर्थिक आव्हान आहे हे खरे असले तरी सामान्य जनतेचे कंबरडे मोडून देशाचा आर्थिक कणा कसा ताठ होणार आहे? उलट जनतेला काही पैशांचा ‘दिलासा’ देण्याऐवजी वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड दरवाढीतून केंद्र सरकारला जी ‘वरकमाई’ झाली आहे, त्यातील काही हिस्सा कोरोना आणि लॉक डाऊनमुळे पिचलेल्या जनतेला द्या. दोन दिवस पेट्रोल-डिझेल काही पैशांनी स्वस्त झाले म्हणून ढिंढोरे पिटू नका. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले म्हणून आपल्या देशात इंधन दरकपात झाली आहे. आसाम- प. बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत इंधन महागाईच्या ‘फोडणी’चा ठसका लागू नये यासाठीही केंद्र सरकारची ही दरकपातीची मखलाशी असू शकते. म्हणजे ‘कारण’ जागतिक बाजारातील दर घसरणीचे आणि ‘निमित्त’ आहे देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे, असा हा सगळा हिशेब आहे. अर्थात सामान्य जनताही वेळ येताच सगळा हिशेब ‘चुकता’ करीत असते हे कोणी विसरू नये इतकेच!
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख