...तर सगळेच भस्म होईल, हे लक्षात ठेवा," ..शिवसेनेचा सरकारला इशारा

मार्च-एप्रिलमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील असे फुगे हवेत का सोडत आहात, असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
modi2.jpg
modi2.jpg

मुंबई : पेट्रोल दरवाढीवरून शिवसेनेने मोदी सरकारला सुनावले आहे. "तुम्ही इंधन-गॅसचे दर कमी करू शकता, ते आधी करा. अन्यथा, उद्या या दरवाढीचा भडका उडेल आणि त्यात कोहळा, आवळा आणि सगळेच भस्म होईल, हे लक्षात ठेवा," असा इशारा 'सामना'च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. 

पेट्रोल-डिझेलच्या दराने आधीच ‘शंभरी’ गाठली आहे. घरगुती गॅसच्या सिलिंडरनेही ‘हजारी’ गाठावी असा काही विचार सरकारचा आहे का? आजच्या दरवाढीने एका एलपीजी गॅस सिलिंडरला सुमारे 820 रुपये मोजावे लागणार आहेत. सरकार म्हणते मार्च-एप्रिलमध्ये हे दर कमी होतील, पण तोपर्यंत ते वाढतच राहतील, त्याचे काय? बरं, पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर कधी कमी होतील याचा काहीच अंदाज देता येणार नाही, असेही सरकारच म्हणते. मग मार्च-एप्रिलमध्ये दर कमी होतील असे फुगे हवेत का सोडत आहात, असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. 

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की... 
कोरोना संकट कोसळल्यापासून आतापर्यंत देशात इंधनाच्या दरात तब्बल 65 टक्के एवढी वाढ झाली आहे. दरवाढीचा हा वेग पाहता एप्रिलपर्यंत ती 100 टक्के वाढीचे वर्तुळ पूर्ण करील असे चित्र आहे. पुन्हा या दरवाढीने जी अप्रत्यक्ष महागाई झाली आहे, त्याचे काय? वाहतुकीच्या खर्चात 40 टक्के, लॉजिस्टिक्सच्या खर्चात 23 टक्के, प्रवास खर्चात, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई आकाशाला भिडली आहे. या गोष्टींना लगाम घालण्याचे सोडून मार्च-एप्रिलमध्ये इंधन दर कमी होतील असे शब्दांचे बुडबुडे सरकार हवेत सोडत आहे. पुढील एक वर्षात दोन कोटी मोफत गॅस जोडण्या देणार असेही सरकार सांगत आहे. ते चांगलेच आहे, पण मोफत गॅस जोडणी घेतल्यावर प्रत्येक सिलिंडरसाठी जर ग्राहकाला हजारावर रुपये मोजावे लागणार असतील तर कसे व्हायचे? 

पेट्रोल दरवाढीची ‘शंभरी’ आणि गॅसची ‘हजारी’ करून जनतेकडून ‘कोहळा’ काढायचा आणि नंतर थोडय़ा दरकपातीचा ‘आवळा’ जनतेच्या हातावर टेकवायचा असा प्रकार सुरू आहे. कोरोनाची सवय सामान्य माणसाला करून घ्यावी लागणार आहे. तशीच सवय जनतेने इंधन दरवाढीबाबत करून घ्यावी का? अनिर्बंध इंधन दरवाढीने सामान्य माणसाचे बजेट पूर्णपणे मोडून पडले आहे. ते सावरण्याऐवजी तेल उत्पादक देशांकडे बोट दाखवून स्वतःची जबाबदारी झटकण्याचे उद्योग सुरू आहेत. तुम्ही इंधन-गॅसचे दर कमी करू शकता, ते आधी करा. अन्यथा, उद्या या दरवाढीचा भडका उडेल आणि त्यात कोहळा, आवळा आणि सगळेच भस्म होईल, हे लक्षात ठेवा.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com