एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्यासह आठ जणांच्या नावाला विरोध.. - Petition filed against the names of Eknath Khadse and Raju Shetty | Politics Marathi News - Sarkarnama

एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्यासह आठ जणांच्या नावाला विरोध..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

राज्यपालांना नवनियुक्त सदस्यांची शिफारस करताना गुणवंत, तज्ज्ञ, कला, सामाजिक, शिक्षण इ. क्षेत्रातील व्यक्तींची निवड करावी, अशी मागणी केली होती. यामध्ये बुधवारी याचिकादारांकडून एक अर्ज दाखल करण्यात आला.

मुंबई : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उमेदवारी दिलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी अशा आठ जणांच्या नावाला विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या उमेदवारांची केवळ राजकीय ओळख असून सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचे योगदान नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेवर ता. 24 रोजी सुनावणी होणार आहे. 

सामाजिक कार्यकर्ते दिलिपराव आवळे आणि शिवाजी पाटील यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत न्यायालयात यापूर्वी याचिका केली आहे. यामध्ये राज्य सरकारने राज्यपालांना नवनियुक्त सदस्यांची शिफारस करताना गुणवंत, तज्ज्ञ, कला, सामाजिक, शिक्षण इ. क्षेत्रातील व्यक्तींची निवड करावी, अशी मागणी केली होती. यामध्ये बुधवारी याचिकादारांकडून एक अर्ज दाखल करण्यात आला. यानुसार आठजणांच्या शिफारशीला याचिकादारांनी विरोध केला आहे. 

यामध्ये नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शेतकरी नेते राजू शेट्टी आदींचा समावेश आहे. येत्या दोन तीन दिवसांत या नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे. न्या संभाजी शिंदे आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांना विधान परिषदेत सदस्यत्व देताना प्राधान्याने सामाजिक, कला , शिक्षण इ. क्षेत्रातील गुणवंत व्यक्तीची शिफारस सरकारने करायला हवी. मात्र दरवेळेस अशा व्यक्तिंचा विचार न करता राजकीय क्षेत्रातील व्यक्तीचा विचार केला जातो, असा आरोप याचिकेत केला आहे. यामध्ये अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, आनंद शिंदे, अनिरुद्ध वनकर आणि नितीन पाटील यांच्या व्यतिरिक्त अन्य आठजण राजकीय क्षेत्रातील मान्यवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यशपाल भिंगे, खडसे, शिंदे, शेट्टी, काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसेन, वनकर तर शिवसेनेकडून ऊर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, पाटील, आणि विजय करंजकर यांची शिफारस करण्यात आली आहे.  

हेही वाचा  : धनंजय मुंडे जेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या पेटीवर बसतात..  
मुंबई : राज्याच्या विरोधीपक्षनेतेपदी असताना मुंबई येथील सीएसटी रेल्वे स्थानकावर ज्या पेटीवर (हमालांचे बसण्याचे एक ठराविक ठिकाण) ९० च्या दशकात स्व. गोपीनाथ मुंडे बसत असत, त्याच पेटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना स्थानकावरील हमाल मंडळीनी बसण्याचा आग्रह केला. धनंजय मुंडे त्याच पेटीवर बसून येथील हमाल मंडळींशी मनमोकळ्या गप्पा केल्या. धनंजय मुंडे यांनी सीएसटी स्थानकावरील हमाल मंडळींना व अन्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, सर्वांना आपल्या शासकीय निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख