स्वार्थासाठी राष्ट्रवादीला दगा देणाऱ्या नेत्यांना जनतेनेच जागा दाखवली : रोहित पवार

काहींकडं पद जरूर आहे; पण लोकांमधील पत मात्र त्यांनी जरूर तपासून घ्यावी.
The people showed the place to the leaders who betrayed the NCP for selfish : Rohit Pawar
The people showed the place to the leaders who betrayed the NCP for selfish : Rohit Pawar

पुणे : गेल्या वर्षी 18 ऑक्‍टोबर 2019 रोजी सातारा येथे धो धो पावसात झालेल्या शरद पवार यांच्या सभेने विधानसभा निवडणुकीचा नूरच पालटून गेला. निवडणुकीनंतर अस्तित्व धोक्‍यात येणार, असे सांगितले गेलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेच्या केंद्रस्थानी आली. त्या सभेला आज एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी त्या वेळी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर शरसंधान साधले आहे.

"स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय,' अशा शब्दांत त्यांनी टीका केली. 

आज एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झाली. पण, विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं. ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत शरद पवार साहेबांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा. त्या सभेच्या आठवणींना उजाळा देत रोहित पवारांनी भारतीय जनता पक्ष आणि त्या वेळी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. 

रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनेक नेत्यांना भरभरुन दिलं, तरीही गेल्या वर्षीच्या तथाकथित महाजनादेशाच्या लाटेला भुलून अनेकांनी कृतघ्नपणा केला. स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय.

राष्ट्रवादीत असताना नेहमी गर्दीत असलेले हे नेते आज खड्यासारखे बाजूला पडले आहेत. यातील काहींकडं पद जरूर आहे; पण लोकांमधील पत मात्र त्यांनी जरूर तपासून घ्यावी. कदाचित त्यांना एकटं पाडून त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचाही ते ज्या पक्षात आहेत, त्यांचा हा डाव असू शकतो, असे सांगून त्यांनी भाजपवरही टीका केली आहे. 

"काही का असेना पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र दगाबाजांना कधीही थारा देत नाही. साहेबांवर, त्यांच्या विचारांवर प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे. खोटे-नाटे, कपोलकल्पित आरोप करुन या प्रेमाची नाळ तोडण्याचा विरोधकांनी अनेकदा प्रयत्न केला. साहेबांना मागे खेचण्यासाठी "ईडी'सारख्या संस्थांचा गैरवापर करत चौकशीचा ससेमिराही मागं लावण्याचा प्रयत्न झाला. पण साहेब डगमगले नाहीत,' असे रोहित पवार म्हणाले. 

आमदार पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'खूनशी विरोधकांना साहेब समजले नाहीत आणि समजणारही नाहीत. त्यामुळे त्यांनी साहेबांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नये. साहेबांचं नेतृत्व कुठल्या लाटेत वर आलेलं नाही, तर त्यामागे त्यांनी तब्बल पाच दशकांहून अधिक काळ केलेली कठोर तपश्‍चर्या आहे.' 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com