मरतायेत तर मरू द्या! वय झाल्यावर मरावेच लागते...भाजप नेता विसरला माणूसकी - People get old and they have to die says bjp minister prem singh patel | Politics Marathi News - Sarkarnama

मरतायेत तर मरू द्या! वय झाल्यावर मरावेच लागते...भाजप नेता विसरला माणूसकी

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 एप्रिल 2021

देशात मागील दोन दिवसांपासून कोरोनामुळे दररोज एक हजारांहून अधिक मृत्यू होत आहेत

भोपाळ : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच आता मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. देशात मागील दोन दिवसांपासून दररोज एक हजारांहून अधिक मृत्यू होत आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढू लागली आहे. पण अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांकडून माणूसकीला काळीमा फासणारी वक्तव्य केली जात आहेत. मध्य प्रदेशातील भाजपचा नेता व मंत्र्याने असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

मध्य प्रदेशातील कोरोनाची साथ आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढू लागला आहे. याबाबत शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री प्रेम सिंह पटेल यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, मृत्यू होत आहेत. त्याला कोणीच रोखू शकत नाही. कोरोनापासून बचावासाठी सर्व जण सहयोगाची चर्चा करतात. विधानसभेत आम्ही सर्वजण चर्चा करत आहोत.

कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरा, अंतर ठेवा आणि तातडीने डॅाक्टरांकडे जा. प्रत्येक ठिकाणी डॅाक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. आपण म्हणत आहात की, दररोज अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. पण लोकांचे वय झाल्यानंतर त्यांना मरावेच लागते, असे वक्तव्य पटेल यांनी केले आहे. त्यावरून पटेल यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पटेल यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. प्रेम सिंह हे मंत्रीपदाच्या लायक नाहीत. त्यांच्या या अमानवी वक्तव्यावर कोणती कायदेशीर कारवाई होणार की नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गेश शर्मा म्हणाले. नेटकऱ्यांनीही पटेल यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. अनेक रुग्णालये ओसंडून वाहत आहेत. लोकांना रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत आहे. अशाचत पटेल यांचा व्हिडिओ समोर आल्याने वाद निर्माण झाला आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख