स्थायी समितीचा अध्यक्ष भाऊंचा की दादांचा होणार... - pcmc chairmanship of the Standing Committee BJP NCP | Politics Marathi News - Sarkarnama

स्थायी समितीचा अध्यक्ष भाऊंचा की दादांचा होणार...

उत्तम कुटे
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

स्थायी समिती सदस्यपदी निवड व्हावी, यासाठी नगरसेवकामध्ये मोठी चुरस लागलेली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांसह आठ सदस्यांची मुदत या महिनाअखेर संपत आहे. तेथे वर्णी लावण्यासाठी शहराच्या दोन्ही भाजपच्या आमदार कारभाऱ्यांच्या समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे निर्णायकी वर्ष असल्याने स्थायी सदस्यासाठी नगरसेवकात मोठी चुरस लागलेली आहे.

पालिकेच्या या महिन्याच्या सर्वसाधारण सभेत येत्या वीस तारखेला मुदत संपलेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्यांची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नाराज नगरसेविका माया बारणे यांनी शिक्षण मंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या वर्षअखेरीस पुन्हा राष्ट्रवादीत स्वगृही परतणार अशी चर्चा असलेल्या भाजपच्या वीस नगरसेवकांत त्यांचेही नाव आहे. त्यामुळे त्यांची म्हणजे अपेक्षित पद न मिळालेले व गेल्या चार वर्षात एकही पद न मिळालेल्या नाराजांची नाराजी स्थायी समित वर्णी लावून पक्षांतरापूर्वीच डॅमेज कंट्रोल भाजप करते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

आठपैकी सत्ताधारी भाजपचे चार, विरोधी बाकावरील राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना आणि अपक्ष आघाडीचा प्रत्येकी एकेक अशा आठ स्थायी सदस्यांची मुदत या महिनाअखेर संपते आहे. पण, खरी चुरस नाराज नगरसेवक असलेल्या असलेल्या भाजपमध्ये आहे. त्यांना संभाव्य पक्षांतर रोखायचे आहे. सदस्य निवडीनंतरही भाजपमधील चुरस संपणार नाही. नंतर अध्यक्षही निवडला जाणार असल्याने तो कोण होतो, कुठल्या गटाचा होतो, यामुळेही ही चुरस कायम राहणार आहे. सध्याचे स्थायी अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे हे शहराचे एक कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे समर्थक आहेत. तर, महापौर माई ढोरे या शहराचे दुसरे कारभारी भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठीराख्या आहेत.

त्यांच्या अगोदरचे महापौर दादा समर्थक, तर स्थायी समिती अध्यक्ष जुने भाजपमध्ये होते. तर, पालिकेतील तिसरे महत्वाचे पद असलेले सभागृहनेते हे जुने भाजपकडे म्हणजे नामदेव ढाके यांच्याकडे सध्या आहे. सध्याच्य़ा महापौर बदलल्या, तर तेथे दादा समर्थक महापौर होऊ शकतो. तर, स्थायी अध्यक्षपदी पुन्हा भाऊ समर्थक अशी वाटणी होण्याची शक्यता आहे. मात्र, महापौरांना मुदतवाढ मिळाली, तर, स्थायी अध्यक्षपदी पुन्हा दादा समर्थक नगरसेवकाचीच वर्णी लागणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख