पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा : त्यावर पवारांच्या वक्तव्याने काॅंग्रेसला चिंता - patole resigns as chairman of Legislative assembly but reaction of pawar worry for congress | Politics Marathi News - Sarkarnama

पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा : त्यावर पवारांच्या वक्तव्याने काॅंग्रेसला चिंता

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

पटोले यांच्या जागी कोण येणार, याची उत्सुकता... 

नवी दिल्ली : नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून आलेल्या प्रतिक्रियेमुळे हा राजीमामा चर्चेचा विषय ठरला आहे.

पटोले यांच्या राजीनाम्यावर बोलताना शरद पवार यांनी नवी दिल्लीत बोलताना सांगितले की अध्यक्षपद हे काॅंग्रेसकडे होते. ते आता खुले झाले आहे. काॅंग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता नवीन विधानसभा अध्यक्ष ठरवण्यासाठी पुन्हा चर्चा होणार.

पवार यांच्या वक्तव्यानंतर विधानसभेचा अध्यक्ष हा परत काॅंग्रेसचाच होणार का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. पटोले यांची नियुक्ती आता प्रदेश काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी होण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यावर पटोले हे उघडपणे बोलले नाहीत. मला पक्षाने विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा आदेश दिला, तो मी पाळला, एवढेच त्यांनी सांगितले. पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सूपूर्त केला. नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत झिरवळ हेच त्या पदाचा कार्यभार पाहतील.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काॅंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. या पदावरूनच महाआघाडी स्थापन होताना दीड वर्षांपूर्वी वाद झाला होता. काॅंग्रेसचे तत्कालीन प्रभारी मल्लिकार्जून खैरे आणि पवार यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याची चर्चा होती. त्यामुळे त्या बैठकीतून पवार अचानक बाहेर पडले होते. तेथून बाहेर पडताना पवार यांनी पुढील मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे असतील, असे जाहीर केले होते. आता त्याच अध्यक्षपदाचा राजीनामा झाल्याने आणि त्यार पवार यांचे हे आता पद खुले झाल्याची प्रतिक्रिया आल्याने महाआघाडीत काही नवे वारे या निमित्ताने वाहणार का, याची उत्सुकता आहे.  

काॅंग्रेसकडील विधानसभेचे अध्यक्षपद हे शिवसेनेला देण्याची चर्चा आहे आणि त्या बदल्यात काॅग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार, यावरही माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्यावर बोलताना पवार यांनी हा माध्यमांनी तयार केलेला विषय असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे शिवसेनेला विधानसभेचे अध्यक्षपद मिळाले तर ते हवे आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत नव्याने काही खांदेपालट होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख