पार्थ पवार न बोलण्यावर ठाम - Parth Pawar insists on not speaking | Politics Marathi News - Sarkarnama

पार्थ पवार न बोलण्यावर ठाम

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

आजोबा शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यापासून मौन पाळून असलेले पार्थ पवार हे गेल्या चार ते पाच दिवसांपासून माध्यमांशी न बोलण्यावर ठाम आहेत. पार्थ यांनी अपेक्षेप्रमाणे शनिवारी (ता. 15 ऑगस्ट) आपले काका श्रीनिवास पवार यांच्या कण्हेरी (ता. बारामती) येथील निवासस्थानी हजेरी लावली. पण त्या ठिकाणीही त्यांनी पत्रकारांशी न बोलणेच पसंत केले. 

पुणे : आजोबा शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यापासून मौन पाळून असलेले पार्थ पवार हे गेल्या चार ते पाच दिवसांपासून माध्यमांशी न बोलण्यावर ठाम आहेत. पार्थ यांनी अपेक्षेप्रमाणे शनिवारी (ता. 15 ऑगस्ट) आपले काका श्रीनिवास पवार यांच्या कण्हेरी (ता. बारामती) येथील निवासस्थानी हजेरी लावली. पण त्या ठिकाणीही त्यांनी पत्रकारांशी न बोलणेच पसंत केले. 

राम मंदिर भूमिपूजन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण यावर पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विसंगत भूमिका घेतली होती. त्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पार्थ यांना जाहीररित्या फटकारले होते. तेव्हापासून पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यावर भाष्य करण्याचे टाळले आहे. 

पार्थ पवार यांनी गुरुवारी (ता. 13 ऑगस्ट) सायंकाळी सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या ठिकाणी ते सव्वादोन तास होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 14 ऑगस्ट) ते पुण्यात दाखल झाले होते. पुण्यात येऊन त्यांनी कुटुंबातील सदस्य आणि आपल्या काकांची भेट घेतली. त्यानंतर आज (ता. 15 ऑगस्ट) ते अपेक्षेप्रमाणे बारामतीत दाखल झाले होते. 

बारामती तालुक्‍यातील कण्हेरी येथील आपले काका श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पार्थ आज दुपारी पावणे चारच्या सुमारास आले. पण, त्या ठिकाणीही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही. या वेळी पार्थ यांच्या काकी शर्मिला श्रीनिवास पवार यांनी पत्रकारांना सांगितले की "पार्थ हा आमच्याकडे नेहमीप्रमाणे जेवायला आला आहे. सुनेत्रा पवार या कालच (ता. 14 ऑगस्ट) येऊन भेटून गेल्या आहेत. ह्या आमच्या नेहमीप्रमाणे भेटीगाठी आहेत. पार्थ पवार हा माध्यमाशी बोलणार नाही.' 

दरम्यान, पार्थ पवार येणार म्हणून माध्यमांचे प्रतिनिधी सकाळपासून कण्हेरी गावात दाखल झाले होते. पण, पार्थ हे त्या ठिकाणीही माध्यमांशी बोलले नाहीत. स्वातंत्र्य दिनानिमित्त या पत्रकारांना जिलेबी आणि फापड्याचा अल्पोपहार देण्यात आला. 

हेही वाचा : पुणेकर दातेंनी चमकावले ट्रम्प यांच्या डोळ्यासमोर तारे 

वॉशिंग्टन : मूळचे पुण्याचे असलेले शिरीष दाते यांनी अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असा काही प्रश्‍न विचारला की क्षणभर त्यांच्या डोळ्यासमोर तारेच चमकले. "अमेरिकन जनतेबरोबर तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्‍चाताप वाटतो का?' असा शिरीष दाते यांचा प्रश्न होता. त्यावर काही सेकंद विचार करून ट्रम्प यांनी शिताफीने हा अडचणीचा प्रश्न टाळून ते दुसऱ्या प्रश्नाकडे वळले. 

पुणेकर शिरीष दाते यांनी असा अडचणीचा प्रश्न विचारुन सर्वांनाच धक्का दिला. व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षात त्या वेळी उपस्थित असलेले सगळेच जण काही क्षणासाठी दाते यांच्या या प्रश्नाने अवाक झाले होते. 

भारतीय-अमेरिकन वंशाचे शिरीष दाते मूळचे पुणेकर आहेत. त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला आहे. व्हाइट हाऊसचे प्रतिनिधी म्हणून ते हफिंगटन पोस्टसाठी काम करतात. "मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षांनंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्‍चाताप वाटतो का?' असा प्रश्न दाते यांनी विचारला होता. त्यांचा हा प्रश्न राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रचंड अडचणीचा ठरला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख