माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची अटक तूर्तास टळली.. - Parambir Singh will not be arrested immediately state government  | Politics Marathi News - Sarkarnama

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची अटक तूर्तास टळली..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

परमबीर सिंग  यांना तूर्तास अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त व राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग Parambir Singh यांना तूर्तास अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.  परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 20 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.  पुढच्या सुनावणीपर्यंत परमबीर सिंग यांना आम्ही अटक करणार नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.  Parambir Singh will not be arrested immediately state government 

आठवड्याभरात परमबीर सिंग यांच्या याचिकेवर राज्य सरकारकडून रिप्लाय फाईल केला जाणार आहे. तोपर्यंत अटकेची कारवाई नाही. परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर ठाण्यात दाखल असलेला गुन्हा  रद्द व्हावा, आणि या प्रकरणात सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, यासाठी याचिका केली आहे. अकोल्यातील पोलिस अधिकारी भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लिहिलेलं पत्र मागे घ्यावं, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

ठाकरे साहेबांना बारमालकांची काळजी.. सामान्य माणसा,  "तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे.." उपाध्यांचा टोला
 
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पत्र लिहिले होते. यात अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. 

राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत. 

फेब्रुवारीच्या मध्यात गृहमंत्र्यांनी वाझेंना बोलावून घेतले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे दोन कर्मचारीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वाझेंना महिन्याला 100 कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत 1 हजार 750 बार, रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून 40 ते 50 कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांना जमा करावेत, असे त्यांनी सांगितले, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. 

अँटिलिया प्रकरणाची माहिती देण्यासाठी या महिन्यातच मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी मी  अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट आणि चुकीच्या कामांबद्दल माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या कानावरही मी हे घातले होते. काही मंत्र्यांना हे आधीपासून माहिती असल्याचे त्यावेळी मला लक्षात आले होते, असा दावाही परमबीर सिंग यांनी केला आहे. 
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख