पंकजा मुंडे घेणार शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भेट.. - Pankaja Munde to meet Sharad Pawar  | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडे घेणार शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भेट..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

"कोयत्याला न्याय मिळेल, ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा," असं आवाहन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

मुंबई : "कोयत्याला न्याय मिळेल, ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा," असं आवाहन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील व साखर कारखाना संघाच्या अध्यक्षांना भेटणार असल्याचे मुंडे यांनी सांगितलं. मुंडे यांनी याबाबत टि्वट केलं आहे.  

कोरोनामुळे अनेक व्यवसाय, उद्योग अडचणीत आले आहेत. साखर कारखान्यांवरही कोरोनाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार व मुकादमांना आर्थिक संकटांशी सामना करावा लागत आहे, या प्रश्नांवर लढण्यासाठी पंकजा मुंडे या सक्रीय झाल्या आहेत. 

आपल्या टि्वटमध्ये पंकजा मुंडे म्हणतात, "ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल. तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे."

ऊसतोडणी कामगारांची मागील 5 वर्षातील अंतरीम वाढीसह मजूरीत 150 टक्के वाढ द्यावी. तसेच मुकादमांचे 37 टक्क्यांपर्यंत कमिशन वाढवावे, कामगारांचा विमा हा कारखान्यांनीच भरला पाहिजे. तसेच येणे जाणे भाडे 100 टक्के कारखान्यांनीच दिले पाहिजे. प्रत्यक्षात गाडीभाडे 20 हजार असेल तर कारखाना 12 हजार रुपये आणि मुकादम 8 हजार पदर भरतो. अशा विविध मागण्या ऊसतोड मजूर आणि मुकादमांच्या आहेत. 
 

हेही वाचा : ग्रामपंचायत विधेयकावरून विरोधकाचा सभात्याग... 

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली हे पावसाळी अधिवेशन होत आहे. आज सकाळच्या सत्रात ग्रामपंचायत विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने आले. विरोध पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीवर आक्षेप घेतला. या विधेयकाला विरोध करीत विरोधकांनी सभात्याग केला. न्यायालयात सुनावणी असताना हे विधेयक आणू नका, न्यायालयाच्या विरोधात सरकार भूमिका घेत आहे. न्यायालयानं जो निर्णय दिला आहे. त्यानुसार नियुक्ती करा,असे फडणवीस यांनी सांगितले. राज्यपाल निवडताना आपण काही जाहीरात‌ देत नाही, जो योग्य व्यक्ती असेल त्याला नेमतात. खाजगी व्यक्ती आम्ही नेमत‌ नाही. सरपंचांना मुदतवाढ देता येत‌ नाही, असे स्पष्टीकरण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख