Pankaja Munde distances her from BJP agitation against state govt | Sarkarnama

खडसे, तावडे, शिंदे आणि बावनकुळे हाती फलक घेऊन उभे! पण पंकजांची नाराजी कायम!

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 22 मे 2020

पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

नगर : विधानसभा निवडणुकीत पराभवाचा किंवा तिकिट नाकारण्याचा दणका बसला, तरीही विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकीची आशा धरून बसलेल्या भाजपनेत्यांना पक्षाने ऐनवेळी दणका दिला. ज्येष्ठांना संधी न देता नवख्यांना जवळ केले. त्यामुळे या नेत्यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली होती. तथापि, विधान परिषद निवडणुकीत हाती काहीच लागले नसल्याने आणि दुसरा पर्यायच नसल्याने त्यांनी अखेर भाजपच्या आंदोलनात सहभागी झाले.  भाजपने महाआघाडी सरकारच्या विरोधात पुकारलेल्या `महाराष्ट्र बचाओ` आंदोलनात हे नेते सहभागी झाले. आपली नाराजी दूर झाल्याचे त्यांनी एक प्रकारे संकेतच दिले आहेत. पण या साऱ्यापासून फक्त एकच नेत्या दूर राहिल्या. त्या अर्थातच पंकजा मुंडे 

माजी मंत्री विनोद तावडे प्रा. राम शिंदे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आदींनी आज आंदोलनात सहभाग नोंदविला. चाैंडी येथील स्वतःच्या बंगल्यासमोर प्रा. राम शिंदे सहकुटुंब हातात फलक घेवून उभे राहून आंदोलनात सहभागी झाले. तोंडाला काळे मास्क लावून महाआघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. जळगावजवळील मुक्ताईनगरमधील आपल्या कोथळी गावातील घरासमोर अंगणात उतरून एकनाथ खडसे यांनी आंदोलन केले. `मेरा आंगण, मेरा रणांगण` हे आंदोलन पुकारून त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरजवळील कामठी तालुक्यातील कुराडी या गावात बंगल्यासमोर सहकुटुंब त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. तावडे हे फडणवीस यांच्यासोबत मुंबईत आंदोलनात सहभागी झाले होतेे. 

अशा होत्या घोषणा अन फलक
`उद्धवा अजब तुझे सरकार`, `महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, पण उद्धव सरकार मात्र आपल्या घरात`, `कोरोनाचं संकट होतंय फारच गडद`, `गोरगरीबिला सोडले वाऱ्यावर` असे फलक घेवून या नेत्यांनी सरकारचा धिक्कार केला. एव्हढेच नव्हे, तर आपल्या कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी करून घेत आपण प्रवाहाच्या दूर नसल्याचे दाखवून दिले. 

या साऱ्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांनी राज्य सरकारवर जोरात टीका केली. या साऱ्या धामधुमीत पंकजा मुंडे कोठेच सहभागी नव्हत्या. विधान परिषदेचे तिकिट नाकारल्यानंतर प्रत्येक नेत्याने प्रतिक्रिया दिली. खडसें आणि शिंदेंनी थेट नाराजी, तावडे यांनी या विषयावर कोरोनानंतर बोलू अशी भूमिका घेतली. बावनकुळे यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केेले. याउलट पंकजा यांनी भाजप उमेदवारांना आशिर्वाद देण्याची भूमिका पार पाडली. पण आपण नाराज आहोत की नाही, यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र भाजपच्या आजच्या आंदोलनात सहभागी न होऊन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, असे त्यांचे समर्थक म्हणतात.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख