पंकजा मुंडे यांची ठाकरे सरकारवर पहिल्यांदाच टीका! म्हणाल्या.... - pankaja munde criticizes thaceray govt first time | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडे यांची ठाकरे सरकारवर पहिल्यांदाच टीका! म्हणाल्या....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

पक्षात मानाचे स्थान मिळाल्यानंतर पंकजा पुन्हा सक्रिय... 

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या ठाकरे सरकारवर टीका करत नाहीत, अशी चर्चा नेहमीच असायची. ठाकरे सरकारविरोधात टीका करण्यासारखे काही नाही, म्हणून मी त्यावर बोलत नाही, अशी सारवासारव त्या करायच्या. आता राष्ट्रीय सचिव बनल्यानंतर आणि मध्य प्रदेशची भाजपची सहप्रभारी म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पंकजा यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

त्यासाठी निमित्त मिळाले आहे ती वाढीव वीजबिलाचे. `ठाकरे सरकार दुतोंडी आहे. सरकार आश्वासन देते मात्र, पूर्ण करत नाही. वाढीव वीजबिलाची मीसुद्धा शिकार आहे, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळ अभिवादन करण्यासाठी पंकजा गेल्या होत्या. तेथेही त्यांनी हा मुद्दा काढला. त्या म्हणाल्या, ``मनामध्ये आदराच्या भावना आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. मी अभिवादन करण्यासाठी येथे आलेले आहे. बाळासाहेब पक्ष म्हणून एका विचाराचे राहू शकत नाहीत. ते सर्वांचे आहेत. मुंडेसाहेब आणि बाळासाहेब यांचे घरगुती संबंध होते आणि पुढील पिढ्यांतही आहेत. 

वीजबिल वसुली लॉकडाऊनच्या काळात करण हे अन्यायकारक आहे. अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. वीजबिलात सवलत देणे गरजेचे आहे, या मागणीचा त्यांनी तेथे पुनरुच्चार केला. वाढीव वीजबिलाच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिल आल्याने राज्यातील कित्येक नागरिक त्रस्त आहेत. वाढीव आलेले वीजबिल कमी करण्याची मागणीही राज्यातील नागरिकांकडून होत आहे. 

लाॅकडाऊन काळातील आलेले वाढीव वीजबिल माफ करावे, अशी मागणी विरोधकांनी वेळावेळी केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावरुन 29 ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. जर वेळ पडली तर मी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार, असे राज ठाकरे म्हणाले होते.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. तसेच वापर केला त्याप्रमाणेच वीजबिले आल्याचा दावा पुन्हा आज पत्रकारांशी बोलताना केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख