मुंडे भगिनींकडून नव्या मंत्र्यांचे अभिनंदन नाही...   - Pankaja Munde and Pritam Munde did not congratulate any of the ministers | Politics Marathi News - Sarkarnama

मुंडे भगिनींकडून नव्या मंत्र्यांचे अभिनंदन नाही...  

अमोल जायभाये
गुरुवार, 8 जुलै 2021

या मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मंत्रिपद मिळेल. अशी जोरदार चर्चा सुरु होती.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी (ता. ७ जुलै) सायंकाळी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मंत्रिपद मिळेल. अशी जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे भाजप नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde) व प्रीतम मुंडे या भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या दोन्ही भगिनींनी एकाही मंत्र्याचे अभिनंदन केले नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. (Pankaja Munde and Pritam Munde did not congratulate any of the ministers) 

मुंडे भगिनींनी एकाही मंत्र्यांच्या अभिनंदनाचे ट्विट का केले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. डॉ. भागवत कराड हे ओबीसी नेते आहेत, त्यांनाही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे, भागवत कराड हे मराठवाड्यातील आणि गोपीनाथ मुंडे यांचे जुने निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी पंकजा मुंडे यांच्या सोबतही काम केले आहे. तरीही मुंडे भगिनींनी त्यांचेही अभिनंदन न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील बहुतेक बड्या नेत्यांनी आणि खासदारांनी नव्या मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचेही अभिनंदन अनेकांनी केले आहे. असे असताना मुंडे भगिनींनी अभिनंदनाचे ट्विट न करणे, त्यामुळे त्या नाराज असल्याचे संकेत देत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

हेही वाचा : राणेंकडे लघु उद्योग, कराडांना अर्थ, पटलांना पंचायत राज, तर पवारांकडे आरोग्य खाते

बुधवारी मंत्री मंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार याबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. त्यातच प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार असून त्या दिल्लीकडे रवाना झाल्याची बातमी आली होती. राज्यभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी लगेच ट्विट करून खुलासा केला. त्या म्हणाल्या होत्या की ''खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत..'' हे ट्विट प्रीतम यांनी रिट्विट केले होते. त्यामुळे चुकीची बातमी आहे असे सांगणारे ट्वीट केले तर मग मंत्र्यांचे अभिनंदन करणारे ट्वीट का केले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 
या विषयी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे नाराज आहेत का असा प्रश्न विचारला होता. त्यावर फडणवीस म्हणाले,  केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात कार्यक्षमता पाहून स्थान देण्यात आले आहे. डॉ. प्रितम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी कुठेही नाराजी व्यक्त केलेलेली नाही. उगीचच त्यांच्या नाराजीच्या वावड्या उठवू नका. 

हेही वाचा :  फडणवीस, स्थानिकांची नाराजी हिना गावितांना भोवली; मंत्रिपद हुकले

फडणवीस नाशिक महापालिकेच्या बससेवेच्या उद्‌घाटनासाठी आले होते. उद्‌घाटन समारंभानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवास साधला. केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात राज्याला चांगले स्थान मिळाले आहे. राज्यात शिवसेनेची कोंडी करण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे काय? यावर ते म्हणाले, नारायण राणे हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांना प्रदिर्घ राजकीय अनुभव आहे. त्यांचा स्वतःचा मोठा अनुभव विचारात घेऊन वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार करूनच त्यांना मंत्रीमंडळात स्थान दिले असावे. त्यामुळे माध्यमांतून येणाऱ्या याबाबतच्या बातम्यांत काहीही तथ्य नाही.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख