सरपंच आरक्षण नव्याने होणार...या तारखेला सोडत - Pandharpur reservation for the new Sarpanch post on 22 February | Politics Marathi News - Sarkarnama

सरपंच आरक्षण नव्याने होणार...या तारखेला सोडत

प्रमोद बोडके
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

नव्या आरक्षणानुसार या गावातील सरपंचांची निवड होणार आहे. 

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील 72 आणि सांगोला तालुक्यातील 61 गावच्या  सरपंचपदाचे आरक्षण नव्याने करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. 22 फेब्रुवारी रोजी नवीन सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार आहे. ता. 26 फेब्रुवारी रोजी नव्या आरक्षणानुसार या गावातील सरपंचांची निवड होणार आहे. 

सरपंच आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या 22 याचिकांची सुनावणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर झाली.  

मोहोळ , माढा, माळशिरस व  दक्षिण सोलापूर या तालुक्यातील सरपंच निवडीचे जुने आरक्षण कायम करण्यात आले आहे. या तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी 23 फेब्रुवारीला होणार आहे. पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात तहसीलदारांनी केलेल्या आरक्षणावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नव्याने आरक्षण करण्याची करण्याचे आदेश दिले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील उडगी आणि मुंडेवाडी या दोन गावाच्या सरपंचाची आरक्षण सोडत 22 फेब्रुवारीला काढण्यात येणार आहे. 

नव्या आरक्षणानुसार 26 फेब्रुवारी रोजी या गावातील सरपंच व उपसरपंच यांची निवड केली जाणार आहे. बार्शी तालुक्यातील ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला या प्रवर्गातील आरक्षण चुकले असल्याचा निष्कर्ष जिल्हाधिकारी शंभरकर यांनी काढला आहे. या प्रवर्गातील आरक्षणाची सोडत 22 फेब्रुवारीला काढली जाणार आहे. नव्या आरक्षणानुसार 26 फेब्रुवारीला बार्शी तालुक्यातील या दोन प्रवर्गातील सरपंचांची निवड केली जाणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील सरपंच पदाची निवडणूक पार पाडली जाणार आहे. तसे आदेश संबंधितांना लवकरच दिले जाणार आहेत. 

 गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी, महसूल
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख