पलानीस्वामी अण्णाद्रमुकचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ! स्टॅलिन टक्कर देणार !  - Palaniswami AIADMK's CM candidate! Stalin will fight! | Politics Marathi News - Sarkarnama

पलानीस्वामी अण्णाद्रमुकचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ! स्टॅलिन टक्कर देणार ! 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

आज करूनानिधींचे वारसदार स्टॅलिन आहेत तर जयललिता यांचे पलानीस्वामी आणि पन्नेरसेल्वम

चेन्नई : 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तमिळनाडूमध्ये सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यापासून विरोधीबाकावर बसलेल्या डीएमकेने राज्यातील जनतेचे अनेक प्रश्‍न हाती घेत आंदोलने केली आहेत. त्यामुळे सत्तारूढ अणाद्रमुक पक्षाचे नेते काहीसे धास्तावले होते.

आता या पक्षानेही दिवंगत नेत्या जयललिता यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा जयघोष सुरू केला आहे. 

एकीकडे बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत चालले आहे. तेथे एनडीएतच तूतू मैमै सुरू आहे. नितीशकुमार नाराज कसे होणार नाहीत याची खबरदारी भाजपची मंडळी घेत आहेत. तर एनडीएतील एक घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता बिहारपाठोपाठ तमिळनाडूतील पक्षही मागे कसे असतील. 

The Hindu

माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जयंतीचा मुर्हुत साधत अण्णाद्रमुकने विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे नाव पुढे केले आहे. ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे पक्षाने जाहीर केले आहे. या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री पन्नेरसेल्वम हे जयललिता असतानाच मुख्यमंत्री होते. पुढे ते ही पक्षा बाहेर पडले होते. जयललिता यांच्या निधनानंतर बऱ्याच घडामोडी तेथे घडल्या आणि पन्नेरसेल्वम पुन्हा स्वगृही परतले. यासाठी पलानीस्वामी यांनीच पुढाकार घेतला होता. पक्ष संघटित राहण्यासाठी दोन्ही नेत्यांनी कंबर कसली होती. राज्यात अण्णाद्रमुकचे सरकार आहे. 

आगामी निवडणूक अशी असेल की यामध्ये जयललिताही नाहीत आणि करूणानिधीही नाहीत. तमिळनाडू मधील या दोन्ही नेत्यांनी आलटून पालटून सत्ता संपादन केली. आज करूनानिधींचे वारसदार स्टॅलिन आहेत तर जयललिता यांचे पलानीस्वामी आणि पन्नेरसेल्वमही आहेत. तसे पाहिले तर या दोन्ही नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते. 

अण्णाद्रमुक यावेळी भाजपचा पाठिंबा घेतो का हे ही पाहावे लागले. जयललितांनी भाजपला राज्यात कधी लुडबूड करू दिली नाही. केंद्रात पाठिंबा दिला पण, राज्यात आम्हीच असे धोरण ठेवले. तेच द्रमुकनेही केले. द्रमुक नेहमीच कॉंग्रेसबरोबर राहिला पण, राज्यात कॉंग्रेसला वरचढ होऊ दिले नाही. म्हणजेच तमिळनाडूमध्ये या दोन प्रादेशिक पक्षाचीच चालते. 

आज जयललिता यांच्या जयंतीनिमित चेन्नईत अण्णाद्रमुकने शक्तीप्रदर्शन केले. जयललिता यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पलानीस्वामी यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. अर्थात तिकडे स्टॅलिन हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार. पक्षात त्यांनाही कोणी आव्हान देईल असा नेता आज तरी नाही. तमिळनाडूत 2021 मध्ये पलानीस्वामी विरूद्ध स्टॅलिन असाच सामना रंगणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख