शरद पवारांच्या नातवाला पद्मसिंह पाटलांच्या नातवाचा पाठिंबा  - Padmasingh Patil's grandson supported Sharad pawar's grandsonPartha Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांच्या नातवाला पद्मसिंह पाटलांच्या नातवाचा पाठिंबा 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना जाहीररीत्या फटकारले आणि राज्यात राजकीय चर्चेचे एकच वादळ उठले आहे.

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना जाहीररीत्या फटकारले आणि राज्यात राजकीय चर्चेचे एकच वादळ उठले आहे. शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर पवार कुटुंबातील कोणीही प्रतिक्रिया दिली नसली तरी राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नीतेश राणे आणि पवार यांचे नातेवाईक असलेले उस्मानाबदचे पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी मात्र ट्विट करत पार्थ पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे. 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देत केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असती त्यांनी ‘पार्थ हा अपरिपक्व आहे आणि त्यांच्या मागणीला मी कवडीचीही किंमत देत नाही,’ असे विधान केले होते. 

पवारांच्या त्या विधानावरून राज्यात मात्र एकच चर्चा सुरू झाली. पवार कुटुंबात मतभेद आहेत का, मग अजित पवार यांचे बंड, तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान पार्थ यांच्या उमेदवारीवरून घडलेल्या घटना याचा दाखला देत पवार कुटुंबात आलबेल नसल्याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली. हे सर्व घटत असताना पवार कुटुंबीयांकडून मात्र त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. स्वतः पार्थ पवार यांनी यावर आपल्याला काही बोलायचे नाही, असे सांगितले. 

शरद पवार यांच्या त्या विधानानंतर बुधवारी रात्री अजित पवार यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्या वेळी उपस्थित असलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना पार्थ पवार यांच्याबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर आज सकाळीही अजित पवार मीडियाशी काहीही न बोलता मंत्रालयात निघून गेले. 
ही सर्व चर्चा होत असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी मात्र पार्थ यांची पाठराखण करणारे ट्विट केले. त्यात राणे म्हणतात की ‘आज परत सांगतो..... पार्थ लंबी रेस का घोडा है!!! थांबू नकोस मित्रा..!!’ 

राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना कायम साथ दिलेले आणि नातेवाईक असलेले उस्मानाबादचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी मात्र ट्विट करत पार्थ पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की ‘आपण जन्मजात सैनिक आहात आणि हे मी लहानपणापासून पाहत आलो आहे. मला तुझा अभिमान आहे.’ 

पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे खंदे समर्थक होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते सध्या तुळजापूरचे आमदार आहेत. 

Edited by Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख