चीनच्या संसर्गावर मात केली : डोनाल्ड ट्रम्प - Overcoming China's contagion: Donald Trump | Politics Marathi News - Sarkarnama

चीनच्या संसर्गावर मात केली : डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

कोरोनावर उपचार करून गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प लष्करी रुग्णालयातून व्हॉइट हाऊस येथे परतले आहेत.

वॉशिंग्टन : आपण चिनी संसर्गाला हरवले असून कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी आपल्या अंगी प्रतिकार शक्ती विकसित झाल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

यादरम्यान ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉक्‍टरांचा हवाला देत आपण कोठेही जावू शकतो अशा प्रकारची पोस्ट केल्यानंतर ट्‌विटरने तातडीने कारवाई करत ती पोस्ट वादग्रस्त असल्याचे जाहीर केले.
 
कोरोनावर उपचार करून गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प लष्करी रुग्णालयातून व्हॉइट हाऊस येथे परतले आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक दोन आठवड्यावर आलेली असताना ते आता पुन्हा सक्रिय झाले आहे. 

फॉक्‍स न्यूजने म्हटले की, निवडणुकीतील लढाई लढण्यासाठी अध्यक्ष आता सक्षम झाले आहेत. ट्रम्प यांनी म्हटले की, चीनच्या धोकादायक संसर्गाला आपण हरवले आहे. आपण उच्च दर्जाच्या चाचण्या आणि परीक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

 सध्या चांगल्या स्थितीत असून आता मला चांगले वाटत आहे. संडे मॉर्निंग फ्यूचर्सची संयोजक मारिया बार्तिरोमो यांच्याशी चर्चा करताना ट्रम्प म्हणाले की, आपण केवळ कोरोनावरच मात केली नाही तर आता प्रतिकारशक्तीही निर्माण झाली आहे, असे मला वाटते. मी बाहेर येऊ शकतो आणि तेही लवकरच. 

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी कोरोना संसर्गासंबंधी एक ट्‌विट केले होते, मात्र ट्विटरने ट्रम्प यांच्या पोस्टला फ्लॅग करत चुकीची माहिती देणारी ही पोस्ट असल्याचे सांगितले. त्या ट्विटमध्ये म्हटले की, डॉक्‍टरांनी आपल्याला तंदुरुस्त असल्याचे सांगितले आहे.

याचाच अर्थ की आपल्याला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होणार नाही आणि माझ्यामुळे दुसऱ्याला होणार नाही. आपण प्रचारसभेत येऊ शकतो. समजल्यावर मला खूपच बरे वाटले, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख