धक्कादायक : लॅाकडाऊनमध्ये कोरोना नव्हे रेल्वे ट्रॅक ठरला 8 हजार 700 जणांसाठी कर्दनकाळ - Over 8700 deaths on railway track during Lockdown last year | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : लॅाकडाऊनमध्ये कोरोना नव्हे रेल्वे ट्रॅक ठरला 8 हजार 700 जणांसाठी कर्दनकाळ

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जून 2021

मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर महिन्यातील हे आकडे आहेत.

नवी दिल्ली : देशात मार्च महिन्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॅाकडाऊन जाहीर केला. त्यामुळं रेल्वे, विमानासह सर्व सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. परिणामी, देशभरातील लाखो कामगार मूळगावी जाण्यासाठी घराबाहेर पडले. या वर्षभरात तब्बल 8 हजार 700 जणांना रेल्वे ट्रॅकवर आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी बहूतक जण स्थलांतरीत मजूर असल्याचे समोर आलं आहे. (Over 8700 deaths on railway track during Lockdown last year)

रेल्वे बोर्डानेच माहिती अधिकारी कायद्यांतर्गत ही माहिती दिली आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर महिन्यातील हे आकडे आहेत. मध्य प्रदेशातील माहिती अधिकारी कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी केलेल्या अर्जावर ही माहिती दिली आहे. राज्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे आकडे असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे 8 हजार 733 जणांचा मृत्यू झाला असून 805 जण जखमी झाले आहेत. 

हेही वाचा : जुहीची सुनावणी अन् न्यायालयासमोरच 'लाल लाल होठों पे...' गाण्यावर ताल

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकवर मृत्यू झालेले बहूतेक जण स्थलांतरीत मजूर आहेत. लॅाकडाऊन जाहीर झाल्यानंतर बहुतेक जण रेल्वेट्रॅकवरून आपल्या मूळगावी चालले होते. रस्ते किंवा महामार्गांपेक्षा रेल्वे ट्रॅकचे अंतर कमी असल्याने त्यांनी हा मार्ग निवडला होता. सुरूवातीला लॅाकडाऊन काळात रेल्वेकडून केवळ माल वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. स्थलांतरित मजूरांचा रोष वाढू लागल्यानंतर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. 

काही जणांचा मृत्यू या गाड्यांखाली चिरडून झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मागीलवर्षी औरंगाबादमध्ये मालगाडीखाली 16 मजूरांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, रेल्वेच्या आकडेवारीनुसार 2016 ते 2019 या कालावधीत 56 हजार 271 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे सहा हजार जण जखमी झाले आहेत. 2019 मध्ये सर्वाधिक 15 हजार 204 जणांचा मृत्यू झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. मागील वर्षी झालेले मृत्यू रेल्वेकडून रेल्वे अपघात म्हणून ग्राह्य धरले जात नाही. 

रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या घटनेमध्ये या मृत्यूचा समावेश होतो. त्याचा तपास राज्य पोलिस करतात तसेच राज्य सरकारच त्यांना भरपाई देतं. रेल्वेकडून ट्रॅक ओलांडण्याच्या घटना कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. तसेच रेल्वे क्रॅासिंग गेटची संख्याही कमी करण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख