युध्द सुरू, जागे व्हा! अटल बिहारी वाजपेयींच्या काळातील लष्कर प्रमुख भडकले... - Our nation is at war wake up india says Retired Army chief ved malik | Politics Marathi News - Sarkarnama

युध्द सुरू, जागे व्हा! अटल बिहारी वाजपेयींच्या काळातील लष्कर प्रमुख भडकले...

वृत्तसंस्था
रविवार, 18 एप्रिल 2021

प्रचार सभा, धार्मिक कार्यक्रम, शेतकरी आंदोलन यावरही निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा अडीच लाखांच्या पुढे गेला आहे. अनेक राज्यांमध्ये रुग्णांना अॅाक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे. व्हेंटिलेटरची कमतरताही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. बेडअभावी अनेकांचा मृत्यू होतोय. दैनंदिन मृतांचा आकडा एक हजारापार गेला आहे. यावरून अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लष्कर प्रमुख राहिलेले वेद प्रकार मलिक यांनी लोकांना आवाहन केले आहे.

मलिक यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. कारगील युध्दावेळीही मलिक हे लष्कर प्रमुख होते. त्यांनी प्रचार सभा, धार्मिक कार्यक्रम, शेतकरी आंदोलन यावरही निशाणा साधला आहे. तसेच कारगील युद्धाचा संदर्भ देत त्यांनी आताही आपले कोरोनाशी युद्ध सुरू असल्याचे म्हटले आहे.

'आला देश युध्द लढत आहे. कोरोना महामारीमुळे काल 1338 लोकांचा मृत्यू झाला. त्याआधी 1182 लोक गेले. हा आकडा कारगील युध्दापेक्षा अडीच पटीने अधिक आहे. या युध्दाकडे देशाचं लक्ष आहे का?' प्रचार सभा, धार्मिक कार्यक्रम, शेतकरी आंदोलन यावरच आपली संसाधने संपत चालली आहेत. जागे व्हा!', असे मलिक यांनी नमुद केले आहे.

दरम्यान, देशात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कुंभमेळ्यामध्ये लाखो लोक एकत्र आले आहेत. तसेच पश्चिम बंगालमध्येही प्रचार सभांना मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अनेकांनी त्यावर टीकाही केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी कुंभमेळा प्रतिकात्मक करण्याचे आवाहन आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांना केल्याची माहिती ट्विटरवरून दिली. या संकटाशी लढण्यासाठी ताकद मिळेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले होते. त्यानंतर बंगालमध्ये त्यांच्या दोन प्रचार सभा झाल्या. प्रचार सभेला झालेली गर्दी पाहून ते थोढे भावुकही झाले. या गर्दीचे त्यांनी कौतुकही केले. लोकसभा निवडणुकीवेळी घेतलेल्या सभेपेक्षा चारपटीने गर्दी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या सभांचे व्हिडिओही ट्विट करण्यात आले आहेत. 

बंगालच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाचा आढावा घेतला. औषधे, अॅाक्सीजन, व्हेंटिलेटर्स, आणि लसीकरणावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली. तसेच मागील वर्षाप्रमाणेच आणि कोरोनाशी त्याहून अधिक वेगाने यशस्वीपणे लढाई जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसचे नेते व उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. त्यांनी काल दिवसभराचे पंतप्रधानांच्या तीन ट्विटचा आधार घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आता लवकरच हे पुन्हा सभा घेतील, असे राऊत यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान सभेला झालेली गर्दी पाहून भावूक होतात, त्यांना महामारी वाढण्याची कसलीच चिंता नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख