आरोग्य खात्याने 270 कोटी लूटले..प्रविण दरेकरांचा आरोप - Opposition leader Praveen Darekar accuses the state government  | Politics Marathi News - Sarkarnama

आरोग्य खात्याने 270 कोटी लूटले..प्रविण दरेकरांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

खासगी लॅबशी संगनमत करुनआरोग्य खात्याने सुमारे 270 कोटी रुपयांची लूट केली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मुंबई : कोरोनाच्या काळात खासगी लॅबशी संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्याने सुमारे 270 कोटी रुपयांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. अत्यंत स्वस्त दरात कोरोना चाचण्या करण्याची सरकारी कंपन्यांची तयारी होती, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून जास्त दर आकारणाऱ्या खासगी कंपन्यांना मोकळे रान दिले, असाही आरोप त्यांनी केला.

या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्य सरकारने स्वॅब चाचणीचे दर आता थोडे कमी केले. मात्र, हिंदुस्तान लेटेक्स लि. (एच.एल.एल. लाइफकेअर) या भारत सरकारच्या कंपनीने राज्य सरकारला 19 ऑगस्ट रोजीच ही चाचणी 796 रुपयांत करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, सरकारने हा प्रस्ताव थंड बस्त्यात टाकला. तो मान्य केला असता तर जनतेचे कोट्यवधी रुपये वाचले असते, असेही दरेकर म्हणाले.

ऑगस्ट महिन्यात खासगी लॅबधारकांना शासनाने स्वॅब चाचणीसाठी 1900 ते 2200 रुपये दर मंजूर केला होता. म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान खासगी लॅब धारकांनी प्रत्येक चाचणीमागे साडेबाराशे रुपये जास्त आकारले. आतापर्यंत राज्यात 50 लाख चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 19 लाख 34 हजार चाचण्या खासगी लॅबमधून झाल्या. त्याद्वारे त्यांनी 242 कोटी 92 लाख रुपयांची लूट केली, असा आरोपही दरेकर यांनी केला.

अॅण्टीबॉडी टेस्टमध्येही लूट
जुलै महिन्यात खासगी लॅबधारक अँटीबॉडी टेस्टसाठी एक हजार रुपये दर आकारणी होते. तेव्हा एच.एल.एल. लाईफकेअर कंपनीने या दरापेक्षा कमी म्हणजे 291 रुपयांत अँटीबॉडी टेस्ट करण्याची तयारी दर्शविली होती. तरीही राज्य सरकारने खाजगी लॅब धारकांना त्यासाठी 599 रुपये घेण्याची परवानगी दिली. म्हणजेच प्रत्येक अॅण्टीबॉडी टेस्टमध्येही 300 रुपये लूट सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या पाहता जनतेची 270 कोटी रुपयांची लूट झाली आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला.

पुणे जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावणेपाच हजार नवे रुग्ण

पुणे जिल्ह्यात काल (शुक्रवारी) सलग तिसऱ्या दिवशी पावणेपाच हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ९३८ जणांचा समावेश आहे. दरम्यान, काल ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.याशिवाय जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील रुग्णांचा एक हजारांचा आकडाही काल सलग तिसऱ्या दिवशी क्रॉस झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस वाढू लागल्या स्पष्ट झाले आहे. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २६५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार १७४, नगरपालिका क्षेत्रात ३३२ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ४१ नवे रुग्ण सापडले आहे. 

दरम्यान, आज  मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३७  रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २४ , जिल्हा परिषद क्षेत्रातील २२, नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोघा जणांचा समावेश आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. १०) रात्री ९ वाजल्यापासून काल (ता. ११) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. दरम्यान, काल दिवसभरात ४ हजार ५२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ५७३, पिंपरी चिंचवडमधील १ हजार २७२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ४५२, नगरपालिका क्षेत्रातील १४१ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ८८ जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ७० हजार ८०० झाली आहे. याशिवाय आतापर्यंत  ४ हजार ९६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 
१६५ जण आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख