परिवहन मंत्री परबांच्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत केवळ पोकळ घोषणा : दरेकर - Only hollow announcement about Transport Minister Parab's ST employees : Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

परिवहन मंत्री परबांच्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत केवळ पोकळ घोषणा : दरेकर

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

येत्या आठ दिवसांत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिले नाहीत, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल.

मुंबई : येत्या आठ दिवसांत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिले नाहीत, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न व अन्य प्रलंबित मागण्यांविषयी दरेकर यांनी आज (ता. 17 सप्टेंबर) एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली. एसटीच्या तिजोरीत खडखडाट असला तरी गेले दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने माणुसकीच्या दृष्टीकोनातून या प्रश्नाकडे पाहवे, असेही आमदार दरेकर यांनी या वेळी सांगितले. 

एसटीचे उत्पन्न शंभर कोटी रुपये असून कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी तीनशे कोटी रुपयांचे देणे असल्याचे चन्ने यांनी सांगितले. मात्र कोरोना काळात जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे घर आता पगाराशिवाय कसे चालत असेल, अशा संवेदनशीलतेतून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे.

परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना तीनशे रुपयांचा भत्ता जाहीर करूनही तो अद्याप मिळाला नाही. कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपयांचा विमा देण्याची घोषणा झाली होती, त्याचीही अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप करून, आतापर्यंत मृत्यू झालेल्या 43 एसटी कर्मचाऱ्यांना तत्काळ हे विमा कवच द्यावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली. 

पत्रकारांच्या बाबतीतही सरकारने अशीच संवेदनहीनता दाखवली आहे, पत्रकारांनाही अद्याप विमाकवच मिळाले नाही. अर्थात एसटी ही राज्याची जीवनवाहिनी असल्याने तिच्या कर्मचाऱ्यांकडे सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे.

आम्ही सरकारकडे एसटीसाठी दोन हजार कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली आहे. सरकारने त्यातील एक हजार कोटी रुपये जरी दिले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्यांच्या पगाराचा विषय मार्गी लागेल. पण, सरकारने याबाबत त्वरेने निर्णय न घेतल्यास आंदोलन करू, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. 

एस. टी. कर्मचाऱ्यांना गेली दोन महिने (जुलै व ऑगस्ट) वेतन मिळाले नाही. मुळातच एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा खर्च चालविणे कठीण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख