मुंबई : कांद्याच्या प्रश्नांवर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदी सरकारला बांगलादेशचं उदाहरण देत जाब विचारला आहे. “एकीकडे शेतकरी हिताचे तीन कायदे आहेत, शेतीमालास भाव मिळेल असे सांगणारे आयात धोरणावर का गप्प बसलेले आहे? बांगलादेशला जे जमले ते भारताला का नाही ? यामुळे सरकार कोणासाठी काम करते हे स्पष्ट लक्षात येत आहे.,” असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
बच्चू कडू यांनी टि्वट करीत मोदी सरकारवर टीका केली आहे. “मागील महिन्यापासून भारताने निर्यातबंदी मागे घेतली. यामुळे बांगलादेशात लाल कांद्याची आयात सुरू झाली. परंतु तेथील शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून, बांगलादेशनं कांद्यावर दहा टक्के आयातकर लावला. यामुळे आयातीत कांद्याचे सौदे तोट्यात गेले. आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्याकडे वरील प्रकारे आयातकर लावून स्थानिक शेतकऱ्यांचं होणार्या नुकसानापासून वाचवावं. निर्यातबंदी व आयातीस मोकळे रान उपलब्ध करून देणार्या धोरणांचा आम्ही सक्रियपणे विरोध करणार आहोत,” असे टि्वट त्यांनी केलं आहे.
एकीकडे शेतकरी हिताचे तिन कायदे आहेत, शेतीमालास भाव मिळेल असे सांगणारे आयात धोरणावर का गप्प बसलेले आहे? बांगलादेशला जे जमले ते भारताला का नाही ?
यामुळे सरकार कोणासाठी काम करते हे स्पष्ट लक्षात येत आहे.
(3/3)— BACCHU KADU (@RealBacchuKadu) January 15, 2021
हेही वाचा : अण्णा हजारेंना समजविण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न
नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर आता राज्यातले भाजप नेते जागे झाले असून अण्णा हजारे यांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. याचसाठी काल माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजारे यांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली. प्रत्येकाला आपल्या श्रमाचे दाम मिळावे व कोणाचेही शोषण होऊ नये, ही लोक कल्याणकारी सरकारची जबाबदारी असते. आपल्या देशात जो जनतेचे पोषण करतो, त्याच शेतकऱ्यांचे शोषण केले जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, या साठी मी दिल्ली येथे सात दिवस उपोषण केले होते. त्या वेळी आपल्या कार्यालयाने लेखी आश्वासन दिले ते आपण पाळले नाही. म्हणून मी जानेवारी महिण्याच्या अखेरीस दिल्ली येथे पुन्हा माझ्या जीवनातील शेवटचे उपोषण करत आहे, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच पाठविले आहे.
हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, ''दिल्ली येथे रामलिला मैदानावर २०१८ साली मी सात दिवसांचे उपोषण केले, त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री गजेंद्र शेखावत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना पंतप्रधान कार्यालयाने लेखी आश्वासन घेऊन माझे उपोषण सोडण्यासाठी पाठविले होते. त्यात उल्लेख केला होता, की सरकारने शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ''

