obc vs budhhist dispute in vanchit bahujan aaghadi | Sarkarnama

वंचित बहुजन आघाडीत ओबीसीविरुद्ध बुद्धिस्ट वाद!

मनोज भिवगडे 
सोमवार, 1 जून 2020

वंचित बहुजन आघाडीला विधानसभा व लोकसभा निवडणुकीत यश आले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना एकही आमदार निवडून आला नाही.

अकोला : भारिप-बहुजन महासंघाच्या पायावर उभी असलेल्या वंचित बहुजन आघाडीला अल्पावधितच गटबाजीची लागण झाली आहे. पक्षाच्या ध्येयधोरणाला छेद देत काहींनी ‘वंचित’मध्ये ओबीसीविरुद्ध बुद्धिस्ट असा वाद सुरू केला आहे. अशा कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे इशारा पत्रच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीला विधानसभा व लोकसभा निवडणुकीत यश आले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे वंचित बहजुन आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरून पक्षाच्या अपयशाचे व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. त्यातून वरिष्ठ पातळीवर झालेल्या परिवेक्षणातून पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बाबतीत अनेक गंभीर स्वरुपाचे निरक्षणे नोंदविण्यात आली. त्यात जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी एकदा पद मिळाले की पक्ष बांधणी सोयीस्कररीत्या विसरून जातात. खासदारकी व आमदारकी लढविण्यासाठी आतुर असलेले उमेदवार एकदा निवडणुका झल्या की पक्षाकडे पाठ फिरवतात. पदाधिकाऱ्यांनी किती पक्ष सदस्य नोंदणी केली, हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. अनेक पदाधिकारी व कार्यकर्त खंडणीखोरीच्या माध्यमातून वर्गण्या गोळा करून खासगी समारंभ, सामाजिक माध्यमांवर फोटो व अवाजवी प्रसिद्धीच्या मागे जाऊन पक्ष बांधणीस फाटा देत असल्याचे गंभीर स्वरुपाचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे. 

पक्षामध्ये ओबीसी, मायक्रो ओबीसी, मागासवर्गीय-अती पिछडा वर्ग, आदिवासी, मुस्लीम व अन्य वंचित यांची मोट बांधण्याच्या दृष्टीने हिरिरीने प्रयत्न होणे महत्त्वाचे असताना, त्याउलट अनाठायी गटबाजी व एकमेकांवर कुरघोडी करण्याचे अहंकारी प्रकार होताना दिसत आहे. काही जुने पदाधिकारी हेतुपुरत्सर ओबीसी विरुद्ध बुद्धीस्ट वाद निर्माण करीत आहेत. त्यामुळे खरा ‘वंचित’ हा पक्षापासून दूर जात आहे. हे पदाधिकारी विषमतावादी प्रतिगाम्यांचे हस्तक म्हणून पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्र वैचारिक पाया आहे. त्याचप्रमाणे पक्षशिस्त अति महत्त्वाची असल्याने वरिष्ठ पातळीवरील दक्षता समितीच्या निरीक्षणानुसार यापुढे निष्क्रिय, गटबाजी करणाच्या व प्रत्यक्ष किंया अप्रत्यक्ष पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकत्यांवर कोणतीही पूर्व सूचना न देता निष्काशणाची अथवा निलंबणाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारे पत्र पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी ३१ मे रोजी काढले आहे.
 

वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी हे वरिष्ठ उपाध्यक्ष आहे. त्यांनी नोंदविलेले निरीक्षण व काढलेले पत्र ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. एक-दोन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष बदनाम होत असेल तर अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई होण्यात काहीही गैर नाही.
- अशोक सोनोने, माजी प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख