राज्यातील बहुजन नेते सध्या भांबावलेत : पंकजा मुंडे - obc leaders in state in dilemma says pankja munde | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यातील बहुजन नेते सध्या भांबावलेत : पंकजा मुंडे

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

बहुजन समाजाच्या नेत्यांकडे संशयाने पाहिले जात असल्याचे पंकजा यांचे निरीक्षण

पुणे : राज्याच्या सध्याच्या वातावरणात बहुजन नेते काहीसे भांबावले असून आरक्षणाच्या विषयामुळे अनेक बुहजन नेत्यांपुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहेत. मुळात आरक्षणाच्या विषयावरून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विविध पातळ्यांवर होत आहे, असे मत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमचीही भूमिका आहे. मात्र, बहुजनांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, ही आमची भूमिका आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना मुंडे यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर विस्तृतपणे भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, "भारतीय जनता पक्षात बहुजन नेत्यांचे खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा चुकीची आहे. माझा स्वत:चा तरी तसा अनुभव नाही. मला काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, राज्यातील सध्याचे वातावरण जातींमध्ये तेढ निर्माण करणारे आहे. एक कुणी व्यक्ती हे काम करीत नाही. मात्र, ज्या पद्धतीने वातावरण माध्यमातून उभे केले जाते. त्यामुळे तेढ निर्माण होण्यास खतपाणी घातले जात आहे. पूर्वी शिक्षकांचे, शेतकऱ्यांचे, सरकारी कर्मचाऱ्यांचे मोर्चे निघत होते. गेल्या काही वर्षात जातीवर आधारीत मोर्चे निघत आहेत. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. आरक्षण मिळणे त्यांचा हक्क आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीदेखील मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. मात्र, मराठा आरक्षण देताना बहुजनांच्या सध्याच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये, अशी यामागील भूमिका आहे.''

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाबाबत त्या म्हणाल्या, "कोणताही मोठा नेता पक्ष सोडून गेल्यानंतर तो ज्या पक्षात जातो त्या पक्षाचा काहीसा फायदा होतोच. खडसे यांनी पक्षात अनेक वर्षे काम केले होते. त्यांचा अनुभव मोठा होता. त्यामुळे ते राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांच्या अनुभवाचा फायदा त्या पक्षाला होऊ शकेल.''

माझी राजकीय भूमिका स्पष्ट आहे. मात्र, माझ्याबद्दल शंका निर्माण करणाऱ्यांनी शंका निर्माण होईल, असे वातावण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कट कारस्थाने करण्यात आली. मात्र. मी आहे तिथेच आहे. मी कुठेही जाण्याचा प्रश्‍न येत नाही. दर वेळी माझ्या वक्तव्याचा सोयीचा अर्थ काढला जातो. स्वतःच शंका काढून त्याची उत्तरे माझ्याकडे मागितली जातात, असा अनुभव त्यांनी सांगितला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख