"सोलापूरचे पालकमंत्रीपद नको रे बाबा.." - No Solapur Guardian Minister post Dattatraya Bharane | Politics Marathi News - Sarkarnama

"सोलापूरचे पालकमंत्रीपद नको रे बाबा.."

प्रमोद बोडके
शनिवार, 12 जून 2021

जो माणूस कामच करत नाही त्याला दुख होत नसल्याचे भरणे यांनी सांगितले.

सोलापूर : आरोप-प्रत्यारोप होत असतात, राजकारण होत असते त्याचे वाईट वाटायचे कारण नाही. जे कामच करत नाहीत त्यांना टिका झाल्यास काही वाटत नाही. परंतु मी सोलापूरसाठी खूप काम केले. काम करुनही जर टिका होत असेल तर वेदना होतात. मी सोलापूरसाठी झटलो तरीही माझ्यावर होत असलेल्या टिकेमुळे मला वेदना झाल्या आहेत. त्यामुळेच सोलापूरचे पालकमंत्रीपद नको अशी आपली भावना झाल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. No Solapur Guardian Minister post Dattatraya Bharane

कोरोना लसीकरणाचा आणि रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा संपूर्ण देशातच तुटवडा होता पण आपण फक्त सोलापूर-सोलापूर एवढेच केले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मी व प्रशासनाने चांगले काम केले. मी सोलापूर जिल्ह्यातील तालुक्‍यात जाऊन बैठका घेतल्या. इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री तालुक्‍यात गेले का ? असा सवाल उपस्थित करत मला इतर पालकमंत्र्यांबद्दल बोलायचे नसल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. 

भरणे यांनी इंदापूरमधील एका कार्यक्रमात इंदापूरला पाणी देण्यात नैतिकता आडवी येत असेल तर आपल्याला सोलापूरचे पालकमंत्रीपद नको असे जाहीर वक्तव्य पालकमंत्री भरणे यांनी केले होते. त्याच दरम्यान सोलापूरच्या पालकमंत्रीपदावरुन भरणे यांना हटवावे या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीतील एक गट सक्रिय झाला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर जिल्ह्यातील या नेत्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. ही बैठकीय प्रशासकीय आहे राजकीय प्रश्‍न नको असे सुरुवातीला म्हणणारे पालकमंत्री भरणे राजकीय प्रश्‍नांवर भरभरुन बोलले, मनातील वेदनांना मोकळी वाट करुन दिली. जो माणूस मनापासून काम करतो त्या माणसाला असे झाले तर दुख होणे सहाजिकच आहे. जो माणूस कामच करत नाही त्याला दुख होत नसल्याचे भरणे यांनी सांगितले. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आपण व्यवस्थित हताळली, पीपीई किट घालून सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात जाऊन पाहणी केली. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत माझ्यावर निवडणूक आयोगाने बंधने घातली त्यामुळे मला प्रसार माध्यमांशी संवाद साधता आला नाही. 

पळून जाईल म्हणून मेहुल चोकसीचा जामीन अर्ज डोमिनिकाने फेटाळला...

कोरोना स्थितीचा व विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते भरभरुन बोलले. सोलापूरसाठी आपण काय काय केले याची माहितीच पालकमंत्री भरणे यांनी या पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील नेत्यांनी पालकमंत्री भरणे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी 15 जून रोजी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुण्यात बैठक बोलविली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपणही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले. 
 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख