धनंजय मुंडे यांनी लग्नाचे आश्वासन दिले नाही आणि बलात्कारही केला नाही... - no promise of marriage and no rape by Dhananjay says Renu Sharma | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

धनंजय मुंडे यांनी लग्नाचे आश्वासन दिले नाही आणि बलात्कारही केला नाही...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

धनंजय यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेत रेणू शर्मा यांचा सविस्तर खुलासा

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्धची बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावरील राजकीय आणि कायदेशीर संकट टळले आहे. या साऱ्या प्रकारावर खुद्द रेणू शर्मा यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. ही तक्रार आपण का दिली, या मागचे कारण एका चिठ्ठीद्वारे ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. 

त्यात त्यांनी अनेक बाबींचा खुलासा केला आहे. धनंजय आणि त्यांच्या द्वितीय पत्नी करुणा (रेणू यांची बहिण) यांच्यात मतभेद असून त्यावरून न्यायालयात केसही सुरू आहे. त्यामुळे मी मानसिक तणाव आणि दबावाखाली होते, असे रेणू यांनी म्हटले आहे. एका मोठ्या राजकीय षडयंत्राची मी शिकार होत असल्याची जाणीव मला झाली होती. काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय यांना लक्ष्य करत होते आणि हे चुकीचे असल्याचे मला समजत होते. या प्रकरणात मी घरातील कोणत्याही व्यक्तीचे नाव घेत नाही. कारण मला घरातील मंडळींशी नाते खराब करायचे नाही. धनंजय यांच्याविरुद्धची तक्रार मी पूर्णपणे मागे घेत आहे.

धनंजय यांनी मला कधीही लग्नाचे वचन दिले नव्हते की बलात्कार केला नव्हता, असेही त्यांनी यात म्हटले आहे. त्याबद्दलचे कसलेही फोटो किंवा व्हीडओ नाहीत. कारण असे कधी घडलेच नव्हते. त्यामुळे मुंडे यांच्याविरुद्ध माझी कोणतीही तक्रार नाही आणि मी हा खुलासा पूर्णपणे शुद्धीत करत आहे, असेही शर्मा यांनी शेवटी म्हटले आहे.

शर्मा यांनी केलेल्या आरोपामुळे मोठे वादळ उठले होते. धनंजय यांनाही आपले दुसरे लग्न झाले असून दोन मुले असल्याचे जाहीरपणे सांगावे लागले होते. मुंडे यांच्य राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. मात्र त्यातून ते सहीसलामत सुटल्याचे दिसून येत आहे. दोन मुलांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपविल्याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.  

भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मांवर आरोप केल्यानंतर  आरोपानंतर या प्रकरणात मुंडे यांच्या विरोधातील आरोपाची धार काहीशी बोथट झाली आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर आहे. माझ्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ सदस्यांना याबाबत विश्वासात घेणार आहे. या सर्व वरिष्ठ सदस्यांची मते जाणून घेऊन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही काळजी घेऊ, असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. पण त्यानंतर मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे शर्मा यांच्या विधानावर विश्वास ठेवणे राजकीय नेत्यांना कठिण झाले होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख