कंगना या विषयावर यापुढे चर्चा नाही : संजय राऊत  - No more discussion on Kangana: Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

कंगना या विषयावर यापुढे चर्चा नाही : संजय राऊत 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

शिवसेना पक्ष, पक्षाच्या कार्यक्रमासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलो आहे.

मुंबई : "कंगना रनौट प्रकरणी कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणताही फोन आलेला नाही. त्यांनी नाराजी संदर्भातील कोणतेही वक्तव्ये केलेले नाही. त्या विषयावर चर्चाच झाली नाही. त्याबाबत चर्चा करणे आम्ही आता बंद केले आहे,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

अभिनेत्री कंगना रनौट हिची वक्तव्ये आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया यावर राज्यात राजकीय गदारोळ उठला आहे. कंगना ही शिवसेना, खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी भाषेत टीका करत आहे. कंगना ही बुधवारी हिमाचल प्रदेशातून महाराष्ट्रात दाखल झाली. तत्पूर्वी तिने मी मुंबईत येत असून कोणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवावे, असे आव्हान दिले होते. त्या आव्हानाला शिवसेनेकडूनही प्रतिआव्हान दिले गेले आणि वातावरण तापत गेले. 

कंगना हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्‍मीरशी केली होती. त्यावरून तिच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. कंगनाने आव्हान दिल्याने तिचा निषेध करण्यासाठी मुंबई विमानतळावर शिवसैनिक, तर समर्थनासाठी करणी सेना आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. त्यामुळे विमानतळाला छावणीचे स्वरूप आले होते. 

मुंबई महापालिकेने तिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकल्यावरही कंगनाने मुंबईला चक्क पाकिस्तान संबोधले होते. तसेच उद्धव ठाकरे यांचा एकरी भाषेत उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. मुंबईतील माझी इमारत ही माझ्यासाठी राम मंदिराप्रमाणे होती. आज तेथे बाबर आला आहे. आज पुन्हा इतिहास घडत असून, मंदिर पाडले जात आहे. परंतु, लक्षात ठेवा मंदिर पुन्हा बनेल. जय श्री राम!, असे तिने ट्विटमध्ये म्हटले होते. 

कंगना हिने आजही ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. दरम्यान, कंगना विषयावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तुमच्याडे चुकीची माहिती आहे. अशा अफवा पसरवू नका. असं काहीही घडलेलं नाही. 

पवार आणि सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला नाही. कंगना या विषयावर आमची चर्चा झालीच नाही. त्या विषयावर चर्चा करणे आम्ही आता बंद केले आहे. शिवसेना पक्ष, पक्षाच्या कार्यक्रमासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलो आहे. त्यावरच आमची चर्चा झाली आहे, असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख