लशीचा खिशावर भार; सिरमच्या लशीपेक्षा 'स्पुटनिक'ची किंमत पाचपटीने अधिक - No decision on the price of sputnik V vaccine in india | Politics Marathi News - Sarkarnama

लशीचा खिशावर भार; सिरमच्या लशीपेक्षा 'स्पुटनिक'ची किंमत पाचपटीने अधिक

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 एप्रिल 2021

रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापराला मान्यता देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी आज औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या लशीला परवानगी देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. ही लस भारतीयांना प्रत्यक्षात मे महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. पण अद्याप या लशीची किंमत निश्चित झालेली नाही. या लशीच्या किंमत सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ह या लशीच्या तुलनेत तब्बल पाचपटीने अधिक आहे. 

भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. दररोज दीड लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तसेच दैनंदिन मृत्यूचा आकडाही वाढत चालल्याने सरकारची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे. त्यानुसार रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापराला मान्यता देण्यात आली आहे.

ही लस मे महिन्यात भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पण अद्याप लशीची भारतातील किंमत निश्चित झालेली नाही. इतर देशांमध्ये ही लस 10 डॅालर म्हणजेच सुमारे 750 रुपयांना दिली जाते. तर सिरम इन्स्टिट्युटची लस केंद्र सरकारला केवळ दोन डॅालर म्हणजे 150 रुपयांनाच मिळते. तर नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये ही लस 250 रुपयांना दिली जाते. सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत देण्यात येते. 

स्पुटनिक व कोविशिल्डची तुलना केल्यास किंमतीत पाचपटीने फरक आहे. दोन्ही लशींमधील किंमतीत मोठा फरक असल्याने रशियन डायरेक्ट इन्व्हेटमेंट फंड (आरडीआयएफ) कडून किंमतीत फारशी कपात केली जाणार नाही, असे दिसते. सिरमच्या बरोबरीने लशीची किंमत आणण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे लशीची किंमत ठरवताना केंद्र सरकारला मोठी तडजोड करावी लागू शकते. 

आरडआएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रीव म्हणाले, कोविशिल्ड लशीच्या तुलनेत स्पुटनिक बाजारात खूप महाग आहे. सर्व देशांमध्ये स्पुटनिकची किंमत जवळपास सारखीच आहे. भारतासह आतापर्यंत 60 देशांनी या लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. उत्पादनाचा विचार केल्यास लशीची किंमत एवढी कमी होणे शक्य नाही. पण सरकार व खासगी बाजारातील किंमती वेगळ्या कऱण्याबाबत काही उपाय सुचविता येतील, असेही ते म्हणाले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख