माणच्या सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर..उपसभापतींवरील अविश्वास ठराव नामंजूर - no confidence motion passed on maan panchayat samiti chairpersons | Politics Marathi News - Sarkarnama

माणच्या सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर..उपसभापतींवरील अविश्वास ठराव नामंजूर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

माण पंचायत समितीच्या सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला  आहे.

गोंदवले : माण पंचायत समितीच्या सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला असून उपसभापतींवरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला आहे. दहिवडी येथे पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी पीठासन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत अविश्वास ठरावावरील मतदान प्रक्रिया झाली. या प्रक्रियेदरम्यान पंचायत समितीच्या आवारात पुरेसा बंदोबस्त ठेवला होता.

माणच्या सभापती कविता जगदाळे व उपसभापती तानाजी कट्टे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. विकासकामात अडथळे आणतात. अरेरावीची भाषा वापरतात, ही कारणे देत आठ सदस्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सभापती व उपसभापती यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला होता. 

उपसभापती तानाजी कट्टे, सदस्य रमेश पाटोळे, नितीन राजगे, तानाजी काटकर,  अपर्णा भोसले, लतिका वीरकर, रंजना जगदाळे, चंद्राबाई आटपाडकर या सर्वपक्षीय सदस्यांनी हातवर करून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. स्वत: जगदाळे व विजयकुमार मगर यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. अविश्वास ठराव देणाऱ्या सदस्यांसोबत असलेल्या मगर यांनी मतदानावेळी माघार घेत  जगदाळे यांची बाजू घेतली.

सूर्यवंशी यांना गटविकास अधिकारी एस. बी. पाटील यांनी सहकार्य केले. पाटील यांनी प्रस्तावाचे वाचन केल्यानंतर  कविता जगदाळे यांच्याविरोधातील ठरावावर मतदान घेण्यात आले. कविता जगदाळे यांच्यावरील अविश्वास ठराव 8 विरुद्ध 2 मतांनी सोमवारी मंजूर करण्यात आला; परंतु उपसभापती तानाजी कट्टे यांच्यावरील अविश्वास ठरावावरील मतदान प्रक्रियेदरम्यान राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास ठराव 2 विरुद्ध 8 अशा मतांनी नामंजूर करण्यात आला.

उपसभापती तानाजी कट्टे यांच्यावर ज्या सदस्यांनी अविश्वास ठराव प्रस्ताव सादर केला होता, त्यातील एक सदस्य सोडून इतरांनी ठरावाच्या विरोधात हात वर करून मतदान केले. त्यामुळे कट्टे यांच्याविरोधातील ठराव नामंजूर झाला. दरम्यान, ठरावावर ज्यांच्या सह्या नाहीत, त्यांचे मत ग्राह्य धरले जाणार का, अशी शंका जगदाळे यांनी पीठासन अधिकाऱ्यांकडे उपस्थित केली. त्यावर, सदस्य म्हणून त्यांना मत देण्याचा अधिकार असल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख