अधिेवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीची शक्यता धुसर... - no chance of state assembly president election in budget session | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

अधिेवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीची शक्यता धुसर...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

येत्या 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता धुसर झाली आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची वाढत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे येत्या 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता धुसर झाली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील आमदार संग्राम थोपटे यांची विधानसभा अध्यक्षपदाची इच्छा लांबणीवर पडली आहे.  

नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार याची विचारणा केली आहे. 

राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली तर कोरोनाबाधित मंत्री, आमदारा यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात न घेता पुढच्या अधिवेशनात घेतली जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरू होत आहे.

सध्या राज्य मंत्रिमंडळातील अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू या नेत्यांचा कोरोनाची लागण झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे हे नुकतेच कोरोनामुक्त झाले आहेत. अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे नुकतेच कोरोना मुक्त झाले असून ते घरूनच काम करत आहेत.

या सर्व मंत्र्यांना अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निडणूक होणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात नव्या अध्यक्षांची निवड केली जाऊ शकते, तसा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सदस्य मतदान प्रक्रियेद्वारे विधानसभा अध्यक्षांची निवड करतात. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाकडून उमेदवार विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतात. विधानसभेची व्यवस्था टिकवून ठेवणे ही अध्यक्षांची जबाबदारी असते. विधानसभेतील सदस्यांनी नियमांचे पालन केले आहे, की नाही यावर अध्यक्ष देखरेख ठेवतात. ते विधानसभेच्या कामकाजा दरम्यान आपला निर्णय देतात. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष कामकाज पाहतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत व्यापक अधिकार आहेत. ते विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख