मोदी विरुद्ध नितीश?  विरोधकांकडून सर्वमान्यता मिळेल!

पंतप्रधानपदासाठी ओबीसी वर्गातीलच नितीश पुढे आले तर त्यांना विरोधकांकडून सर्वमान्यता मिळेल
3Nitish_20Kumar_20_20Narendra_20Modi.png
3Nitish_20Kumar_20_20Narendra_20Modi.png

नवी दिल्ली : नितीशकुमार Nitish Kumar यांना २०२४ मध्ये विरोधी पक्षांचे उमेदवार बनविले तर ममता बॅनर्जी, मुलायमसिंह-अखिलेश यादव, सुखबीर- प्रकाशसिंग बादल तसेच तेजस्वी व लालूप्रसाद व शरद यादव यांच्यासारखे दिग्गज नेतेही त्यांना पाठिंबा देऊ शकतात असे राजकीय वर्तुळात मानले जाते. एका नेत्याच्या मते प्रश्न काँग्रेसचाच असेल तर या पक्षाच्या नव्या नेतृत्वाच्या हाती सूत्रे गेल्यावर त्यांची जी देशव्यापी घसरगुंडी सुरू आहे ती पाहता काँग्रेसलाही नितीश यांच्या नावाला मान्यता देणे भाग पडेल असे दिसते. त्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याच पुन्हा एकदा समंजसपणा दाखवू शकतात असेही या नेत्याने नमूद केले.

इतर मागासवर्गीयांची जनगणना करण्याच्या मागणीने पकडलेला जोर, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील तमाम पक्षनेत्यांसह केलेली दिल्लीवारी व त्यातून ओबीसी राजकारणाला मिळालेली चालना यामुळे २०२४ मध्ये नरेंद्र मोदी Narendra Modi,यांच्यासमोर पंतप्रधानपदासाठी ओबीसी वर्गातीलच नितीश पुढे आले तर त्यांना विरोधकांकडून सर्वमान्यता मिळेल, असा जबरदस्त मतप्रवाह संयुक्त जनता दलच नव्हे तर राजकीय वर्तुळातही आहे.

संयुक्त जनता दलाने याबाबतच्या चर्चेचे जाहीर खंडन केले तरी नितीश उभे ठाकल्यास मोदींच्या हातातील ओबीसी कार्ड त्याचबरोबर एका गरीब पालकांचा मुलगा यांसारखे त्यांचे व संघ- भाजपचे प्रचारतंत्र निस्तेज होईल, असा विश्वास राजकीय तज्ज्ञांना वाटतो. भाजपची साथ सोडलेले जनता दलाचे नेते उपेंद्र कुशवाह Upendra Kushwaha यांनी नुकतेच नितीश हे पंतप्रधानपदाचे ‘मटेरियल' असल्याचे जाहीर वक्तव्य केले. त्यानंतर जदयूनेच काल तातडीने या चर्चेचे खंडन केले व २०२४ मध्ये मोदी हेच भाजप आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे सांगितले. 

जदयू नेते के. सी. त्यागी यांनी ही बाब स्पष्ट केली. मात्र भाजपच्या विरोधात काँग्रेससह सर्व धर्मनिरपेक्ष व राज्यघटना मानणाऱ्या पक्षांची देशव्यापी एकजूट व्हावी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांनी ‘‘जदयूची २०२१ मधील भूमिका व नितीश यांना व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे दिसले तर २०२४ पर्यंत ती बदलू शकते, असा होरा व्यक्त केला. नितीशकुमार यांच्यात पंतप्रधान बनण्याची पूर्ण क्षमता व योग्यता असल्याचे कुशवाह यांनी जाहीरपणे सांगितल्यावर  एकाही जदयू नेत्याकडून त्याचे खंडन करण्यात आलेले नव्हते हेही लक्षणीय मानले जाते. 
सूत्रांच्या मते जेव्हा भाजपच्या दिल्लीच्या नेतृत्वाने याची गंभीर दखल घेऊन, बिहारमधील सरकार जास्त आमदार असलेल्या भाजपच्या पाठिंब्यामुळे आहे, असा मेसेज पाटण्याला पाठविला तेव्हा त्यागी यांच्यामार्फत कुशवाह यांच्या मताचे खंडन करण्यात आले हा योगायोग लक्षणीय आहे. जोवर आम्ही भाजपबरोबर युतीत आहोत तोवर मोदी यांना आम्ही आव्हान देणार नाही पण नितीश यांच्यातही पंतप्रधानपदाची संपूर्ण पात्रता आहे, इतके मोठे वक्तव्य कुशवाह यांनी जदयू नेतृत्वाला न विचारता केलेले असेल यावर शाळकरी मूलही विश्वास ठेवणार नाही असे जाणकार मानतात.

नितीशकुमार आज जरी मोदींबरोबर असले तरी ओबीसी प्रश्नावरून केंद्राच्या प्रतिसादामुळे ते अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. आज जरी ते मोदी यांच्या भाजपबरोबर असले तरी लालकृष्ण अडवानी व अन्य भाजप नेत्यांना २०१३ मध्ये मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवावे लागले तेव्हा भाजप आघाडी सोडणारे पहिले मुख्यमंत्री नितीश हेच होते, इतकेच नव्हे तर मोदी मुख्यमंत्री असताना २००२ मध्ये गुजरातमधे नरसंहार झाला तेव्हाही नितीश यांनीच वाजपेयी सरकारला तत्काळ टाटा केला होता या इतिहासाकडेही जाणकार लक्ष वेधतात. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com