नितीन गडकरींची 'कमाई' जोरात...महिन्याला यूट्यूबकडून मिळताहेत लाखो रुपये - Nitin Gadkari gets so much money from YouTube | Politics Marathi News - Sarkarnama

नितीन गडकरींची 'कमाई' जोरात...महिन्याला यूट्यूबकडून मिळताहेत लाखो रुपये

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 19 मे 2021

कोरोनामुळे (Kovid-19) आयुष्यामध्ये काय बदल घडलेत यावर गडकरी यांनी भाष्य केले.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) मंगळवारी विद्यापिठांमधील कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी गडकरी यांनी अनेक गोष्टींसंदर्भात खुलासा केला. गडकरी म्हणाले, सोशल मीडिया (Social Media) फारसा वापरत नव्हतो, मात्र कोरोना कालावधीमध्ये मी याचा जास्त वापर करु लागलो आहे. कोरोनामुळे (Kovid-19) आयुष्यामध्ये काय बदल घडलेत यावर गडकरी यांनी भाष्य केले. (Nitin Gadkari gets so much money from YouTube)

कोरोना काळात आपल्या दैनंदिन आयुष्याबरोबरच सोशल नेटवर्किंगमुळे घडलेल्या बदलांसंदर्भातही गडकरी यांनी सांगितले. स्वत:च्या यूट्यूब चॅनेलवरुन महिन्याला किती कमाई होते यासंदर्भातील माहितीही दिली. आधी मी फारसा सोशल मीडियावर नव्हतो पण आज मला भाषणांसाठी युट्यूबकडून पैसे मिळतात आणि माझे महिन्याचे चार लाख इनकम सुरु झाले, असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

हे ही वाचा : गंगेत मृतदेह ; मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री योगींना साक्षात्कार

गडकरी म्हणाले, कोरोनामुळे माझ्या आयुष्यात दोन तीन बदल झाले. दररोज सकाळ संध्याकाळ मी २५ मिनिटे पायी चालतो. मोबाइलवर गाणी ऐकण्याबरोबरच युट्यूबवर अनेक व्हिडीओ पाहतो. मी युट्यूबवर भगवतगीताही ऐकू लागलो आहे. मला दहावा अध्याय आणि त्याचे पूर्ण विवेचन शांततेत ऐकण्याची संधी कोरोना कालावधीमध्ये मिळाली. ही माझ्यासाठी मोठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.  

पुढे बोलताना ते म्हणाले, आपण कोरोनापूर्व कालावधीमध्ये फार सोशल नेटवर्किंग फ्रेण्डली नव्हतो. त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर फार सक्रीय नव्हतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला यासंदर्भातील माहिती देत, यावर सक्रीय राहण्याचा आग्रह करायचे. मात्र, मला ते जमत नव्हते. कोरोना कालावधीमध्ये मी जवळजवळ ९५० व्हिडीओ कॉन्फरन्स घेतल्या आणि कोरोना काळामध्ये ट्विटरवर एक कोटी २० लाख फॉलोर्स माझ्याशी नव्याने जोडले गेले, असेही गडकरी यांनी सांगितले.

हे ही वाचा :  दोन जादा आमदारांच्या जीवावर उड्या मारु नका..''राष्ट्रवादीचा शिवसेनेला इशारा...

पुढे हसतच आपल्या सोशल मीडियावरील प्रगतीसंदर्भात बोलताना गडकरींनी सांगितले की ''मी युट्यूबवरुन जी भाषणे दिली त्यासाठी मला आता युट्यूबकडून पैसे दिले जात आहेत. आज मला युट्यूबकडून महिन्याला चार लाख रुपये मिळतात. हे पैसे मी कोव्हिडसंदर्भातील कामांसाठी देणगी म्हणून दिले आहेत,'' असल्याची माहिती त्यांनी दिली. 

या सर्व अनुभवासंदर्भात गडकरींनी एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या १० हजार इंग्रजी प्रती प्रकाशित होण्याआधीच विकल्या गेल्याचे गडकरी म्हणाले. सोशल मीडिया आणि आयुष्यात झालेले बदल हे माझ्यासाठी खूपच वेगळे अनुभव देणारे होते, असे त्यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख