नीती आयोगाच्या परीक्षेत केरळ अव्वल तर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर - NITI Aayog unveils SDG India Index kerala top in list | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

नीती आयोगाच्या परीक्षेत केरळ अव्वल तर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जून 2021

नीती आयोगाकडून गुरूवारी 2020-21 या आर्थिक वर्षाचा अहवाल गुरूवारी प्रसिध्द करण्यात आला.

नवी दिल्ली : आरोग्य, शिक्षण, मागासलेपण, लिंग गुणोत्तर, आर्थिक विकास अशा विविध निकषांच्या आधारे नीती आयोगाने देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांचा अभ्यास करून क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारी केरळ राज्य अव्वल ठरले आहे. तर महाराष्ट्रानेही प्रगती केली असून पहिल्या दहा राज्यांत स्थान मिळाले आहे. (NITI Aayog unveils SDG India Index kerala top in list)

नीती आयोगाकडून गुरूवारी 2020-21 या आर्थिक वर्षाचा अहवाल गुरूवारी प्रसिध्द करण्यात आला. राज्यांचा सोशल, आर्थिक आणि पर्यावरण आदी प्रमुख मुद्यांच्या आधारे मुल्यांकन करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल दरवर्षी प्रसिध्द केला जातो. यामध्ये प्रत्येक राज्याला 100 पैकी गुण दिले जातात. सर्व राज्यांचा विचार करून देशाच्या शाश्वत विकासाचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. त्यानुसार देशाची स्थितीही सुधारली असून 66 गुण मिळाले आहेत. 2019 मध्ये 60 गुण होते. पिण्यायोग्य पाणी, स्वच्छता, परवडणारी ऊर्जा या क्षेत्रातील प्रगतीमुळे ही वाढ झाल्याचे नीती आयोगाकडून सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचा सिद्धूंना बाऊंसर; 'आप'चे तीन आमदार फोडत नेतृत्वालाही इशारा

या क्रमवारीत केरळ अव्वल असून 100 पैकी 75 गुण मिळाले आहेत. तर हिमाचल प्रदेश व तमिळनाडू 74 गुण मिळवत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आंध्र प्रदेशने 72 गुण मिळवत तिसऱ्या क्रमांक मिळवला आहे. गोवा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांनाही 72 गुण मिळाले आहेत. सिक्कीमला 71 तर महाराष्ट्रला 70 गुण मिळाले असून अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळाला आहे.

देशाच्या एकूण सरासरीच्या निर्देशांकापुढे 14 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. 2019 च्या तुलनेत मिझोरामच्या गुणांमध्ये सर्वाधिक 12 ने हरयाणाच्या गुणांमध्ये 10 ने तर उत्तराखंडच्या गुणांमध्ये 8 ने वाढ झाली आहे. महाराष्ट्राचेही गुणही सहाने वाढले आहेत. 

दक्षिणेकडील राज्य सर्वात पुढे

केरळ, तमिळनाडूसह दक्षिणेकडील बहुतेक राज्य या क्रमवारीत आघाडीवर आहेत. तर सर्वात कमी गुण मिळालेल्या राज्यामध्ये मध्य भारतातील राज्यांचा समावेश आहे. तसेच ईशान्येकडील राज्यही या क्रमवारीत मागे असल्याचे अहवालातून दिसून येते. 

हा अहवाल पहिल्यांदा डिसेंबर 2018 मध्ये प्रसिध्द करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या आधारे हा अहवाल तयार केला जात आहे. यामध्ये 17 उद्दिष्ट निश्चित करण्यात आली असून 115 निकष आहेत. या निकषांमध्ये दरवर्षी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं प्रत्येक राज्यातील हे उद्दिष्ट साध्य करण्याची स्पर्धा अधिक परिणामकारक होत चालली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख